– आरोपी अद्याप मोकाटच; २४ तासांचा अल्टिमेटम संपल्यानंतर भोंडेकरांनी टोकली एसपींवर टीकेची तोफ
हंसराज, प्रतिनिधी भंडारा अड्याळ :- पवनी विधानसभा क्षेत्रातील भावड गावात १७ तारखेला भगवान शंकराची मूर्ती विखंडित केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. घटनेला 24 तास उलटूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. या प्रकरणी प्रशासनाला दिलेला २४ तासांचा अल्टिमेटम संपल्यानंतर, आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत आज अड्याळ पोलीस स्टेशनसमोर जोरदार निदर्शनं केली.
२० मिनिटे रास्ता रोको, पोलीस प्रशासनाचा निषेध
आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज अड्याळ पोलीस स्टेशनसमोर सुमारे २० मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत घोषणाबाजी केली. आरोपींना अटक करण्यात पोलीस जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आंदोलनादरम्यान बोलताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) नरुल हसन यांच्यावर थेट शब्दांत हल्ला चढवला. “हिंदू लोकांबाबत अॅलर्जी आहे का?,” असा खळबळजनक आरोप भोंडेकर यांनी केला. हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना होत असताना पोलीस प्रशासन मूग गिळून बसले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

३-४ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा ‘भंडारा बंद’
आमदार भोंडेकर यांनी प्रशासनाला शेवटचा इशारा देताना सांगितले की, “जर येत्या ३ ते ४ दिवसांत मूर्ती तोडणाऱ्या आरोपीला अटक झाली नाही, तर संपूर्ण भंडारा शहर चक्का जाम करण्यात येईल. हे आंदोलन अधिक उग्र होईल आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल.”
या आंदोलनामुळे आणि भावड गावातील घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अड्याळ पोलीस स्टेशन आणि परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आता पोलीस पुढील ३-४ दिवसांत आरोपीला पकडण्यात यशस्वी होतात की आमदार भोंडेकर आपल्या इशाऱ्याप्रमाणे मोठे आंदोलन छेडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली
ही घटना एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा घडली असून, त्यामुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना गंभीरपणे दुखावल्या गेल्या आहेत. महाकालाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
पोलीस प्रशासन आरोपींना अटक करण्याऐवजी केवळ समितीवर समित्या स्थापन करून संबंधितांना धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सीसीटीव्ही बसवण्याचा सल्ला दिला आहे, मात्र सीसीटीव्ही बसवण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे, असे भोंडेकर म्हणाले.
हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या जात असताना, उलट संबंधितांवरच गुन्हा दाखल करण्याची भाषा केली जात असल्यास, ही लोकशाही आहे की पोलिसशाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर एखादा पोलीस अधीक्षक हिंदू धर्माच्या विरोधात काम करत असेल, तर अशा अधिकाऱ्याची भंडारा जिल्ह्यात गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
पोलीस प्रशासनाला इशारा देताना ते म्हणाले की, वर्दीची गरमी कायमची नसते. लोकशाही पद्धतीने आम्हाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेले अधिकार आम्हाला माहिती आहेत. गरज पडल्यास त्या अधिकारांचा वापर करून आम्ही रस्त्यावर उतरू, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.








