spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा बळी

– मालकाच्या अमानवी वक्तव्याविरोधात मृतदेहासह ठिय्या आंदोलन

कामठी :- तालुक्यातील कवठा येथील ट्रुफॉर्म टेक्नो प्रॉडक्ट प्रा. लि. या कंपनीतील अमानवी व बेजबाबदार कारभारामुळे एका निष्पाप कामगाराचा जीव गेला असून, कंपनी मालकाच्या असंवेदनशील वक्तव्यामुळे संपूर्ण परिसर संतप्त झाला.

टेकाडी गावचे रहिवासी प्रमोद नत्थुजी बोराडे (वय ४५) हे गेल्या ८ वर्षांपासून या कंपनीत काम करत होते. मात्र कंपनीत सुरक्षेची कोणतीही साधने नसताना काम सुरू असताना मध्यरात्री लोखंडी प्लेट पोटावर आदळून ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर कुटुंबीयांनी कंपनीकडे उपचार खर्च व भरपाईची मागणी केली असता कंपनीने सरळ हात वर केले. कळस म्हणजे, कंपनी मालकाने फोनवरून “त्याला मरायचंच होत म्हणून आमच्या कंपनीत आला” असे माणुसकीला काळिमा फासणारे वक्तव्य केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

या अमानवी बोलण्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह थेट कंपनीच्या गेटसमोर आणत ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी शेकडो नातेवाईक, कामगार, स्थानिक नागरिकांनी एकत्र येत कंपनी व्यवस्थापनाचा तीव्र निषेध केला. विशेष म्हणजे, सदर कंपनीत कोणतेही सेफ्टी किट, हेल्मेट, बेल्ट, गार्ड, CCTV व्यवस्था, आपत्कालीन वैद्यकीय सोय नाही. कामगारांचे जीव धोक्यात घालून कंपनी सुरू असल्याचा आरोप होत आहे.

मृत प्रमोद बोराडे यांच्या पश्चात पत्नी व अल्पवयीन मुलगी असून कुटुंब उघड्यावर आले आहे. दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, कंपनी सील करावी व कुटुंबाला 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

Popular Articles