spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यात थेलेसेमिया व सिकलसेल रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची मागणी; जीवनज्योती संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- मागील 23 वर्षांपासून थेलेसेमिया आणि सिकलसेल यांसारख्या जीवघेण्या आजारांविरुद्ध लढा देणाऱ्या ‘जीवनज्योती थेलेसेमिया व सिकलसेल संस्था, भंडारा’च्या वतीने आज विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला सादर करण्यात आले. यामध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड, औषधांची उपलब्धता आणि दिव्यांग सवलतींचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक (सामान्य रुग्णालय, भंडारा) आणि जिल्हा आरोग्य अधिकारी (जिल्हा परिषद) यांची भेट घेतली. यावेळी प्रशासकीय स्तरावर होणाऱ्या संबंधित बैठकींची माहिती संस्थेला मिळावी, अशी विनंती करण्यात आली.

. प्रमुख मागण्या:

🔹 थेलेसेमिया व सिकलसेल रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था करण्यात यावी.

🔹 रुग्णांना नियमितपणे PRC रक्त पुरवठा आणि WBC फिल्टर उपलब्ध करून देण्यात यावे.

🔹 आयरन चिलेशनसाठी आवश्यक डिफ्रेजेट (सन फार्मा) टॅब्लेट आणि डिसफरॉल इंजेक्शन यांचा कायमस्वरूपी साठा उपलब्ध असावा.

🔹 या रुग्णांना दिव्यांगांच्या धर्तीवर बस, रेल्वे प्रवास सवलत आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा.

🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्णांची अधिकृत माहिती स्पष्ट करून, खाजगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेचा पूर्ण लाभ मिळावा.

🔹 रुग्णांच्या सोयीसाठी ‘स्वतंत्र एकल खिडकी योजना’ राबवावी.

🔹 दर तीन महिन्यांनी हेमॅटोलॉजिस्ट (तज्ज्ञ डॉक्टर) उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून रुग्णांचे जीवनमान उंचावेल.

🔹 महाराष्ट्र ‘थेलेसेमिया व सिकलसेल मुक्त’ करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा.

यावेळी जीवनज्योती थेलेसेमिया व सिकलसेल संस्थेचे संस्थापक व सचिव रविशंकर साकोरे, रक्तवीर प्रितमकुमार राजाभोज, थेलेसेमिया योद्धाचे पालक मेहताब शेख यांच्यासह संस्थेचे इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने या संवेदनशील विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Popular Articles