मनपाच्या ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’मुळे खेळाडूंना प्रोत्साहन

0
45

– मागील ३ वर्षातील कामगिरीच्या आधारे मिळणार ५० हजार ते दोन लाख पर्यत आर्थिक सहाय्य

नागपूर :- नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नागपूर महानगरपालिका द्वारा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता ‘उडान खेल प्रोत्साहन योजना’ ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. ‘उडान खेल प्रोत्साहन योजने’च्या माध्यमातून मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाद्वारे खेळाडूंना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या योजनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकप्राप्त खेळाडूंना पन्नास हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. इच्छुकांनी १५ फेब्रुवारी २०२६ पूर्वी मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागात अर्ज सादर करावा.

मनपाद्वारे योजनेकरिता नियमावली निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यानुसार, ऑलम्पिक गेम्स, एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप / वर्ल्ड युनिव्हर्सिटी, पॅरा ऑलम्पिक स्पर्धा, ज्यु. एशियन चॅम्पियनशिप, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, ज्यु. विश्व अजिंक्यपद स्पर्धा, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन कप, युथ ऑलम्पिक, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय वरिष्ठ व कनिष्ठ स्पर्धा (शालेय स्पर्धा राष्ट्रीय व शालेय खेलो इंडिया गेम्स) या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पदकांची कमाई केलेल्या खेळाडूंना योजनेचा लाभ मिळणार आहे.

उपरोक्त स्पर्धांच्या अनुषंगाने नागपूर शहरातील खेळाडूंना योजनेद्वारे आर्थिक सहाय्य मिळण्याकरिता वर्गिकरण करण्यात आले आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पदक विजेता (राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, वर्ल्ड कप दर दोन वर्षांनी आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा / एशियन चॅम्पियनशिप) यांना २ लाख रुपये, सहभागी खेळाडू (ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा) यांना १ लाख रुपये, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पदक प्राप्त खेळाडू यांना १ लाख रुपये व सहभागी यांना २१ हजार रुपये, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा व कनिष्ठ गट, राष्ट्रीय स्पर्धा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण, विभागाद्वारे मान्यता प्राप्त क्रीडा प्रकार, (ऑलम्पिक क्रीडा प्रकार/आशियाई क्रीडा प्रकार/ राष्ट्रकुल क्रीडा प्रकार) पदक विजेता यांना ५० हजार रुपयांचे अर्थ सहाय्य दिले जात आहे. अशी माहिती मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी दिली आहे.

नियम व अटी शर्ती

१. कुटुंबाचे नागपूर महानगरपालिका क्षेत्रात किमान ५ वर्षे वास्तव्य असल्याबाबतचा पुरावा म्हणून मालमत्ताधारक असल्याचा चालु वर्षाचा मालमत्ता कर भरल्याबाबतची पावती/निवडणूक ओळखपत्र/मतदार यादीतील नांव/पाणीपट्टी विजबिल/तीन वर्षाचा भाडे करारनामा/रेशनकार्ड/विवाह नोंदणी दाखला पुरावा म्हणून सादर करावा लागेल. (उपरोक्त पैकी कोणतेही दोन पुरावे सादर करणे अनिवार्य राहील.)

२. आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, सादर करणे बंधनकारक राहील.

३. अर्जासोबत खेळाडू असल्याबाबतचे प्राविण्य प्राप्त प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.

४. संबंधित प्राविण्यप्राप्त स्पर्धेचे अधिकृत क्रीडा प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत संलग्नित करणे अनिवार्य आहे.

५. अर्जासोबत खेळाडू असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाकडून प्राप्त प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.

६. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये खेळाडूंना आर्थिक लाभ मिळण्यास मागील एक वर्षाचा (२०२४-२५) या Performance ग्राह्य धरून Evaluation करण्यात येईल.

७. भारतीय शालेय खेल महासंघ अथवा अधिकृत भारतीय खेळ संघटना यांच्या वतीने अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाल्याबाबत प्रमाणपत्र संबंधित खेळाडूकडे असावे. निमंत्रित स्वरुपाच्या स्पर्धांसाठी झालेली निवड पात्र ठरणार नाही. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय खुल्या वरिष्ठ गटातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य अथवा क्रीडा शिष्यवृत्ती यासाठी संबंधित खेळ संघटनेचे प्रमाणपत्र यांचे झेरॉक्स प्रत सत्यप्रत करून सादर करणे आवश्यक आहे.

८. सदर योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानाच्या रकमेचा क्रीडा प्राविण्यासाठीच्या बाबींवर खर्च करण्यात येईल याचे बंधपत्र दयावे लागेल.

९. सदर योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वळते करण्यात येईल.

१०. अर्जासोबत अर्जदाराचा अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट साईज फोटो लावणे आवश्यक राहील.

११. सदर योजनेचा लाभ प्रत्येक खेळाडूना केवळ एकदाच देण्यात येईल.

१२. अर्जासोबत जोडण्यात आलेले सर्व छायांकित कागदपत्रे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असावेत.

१३. दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने सदर योजनेचा लाभ मंजुर करणे अथवा नाकारणे तसेच अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अंतिम अधिकार मा. आयुक्त यांना राहील.

१४. क्रीडा मंडळे, संस्था, निमशासकीय संस्था यांनी आयोजित केलेल्या स्पर्धामधील प्रमाणपत्रे योजनेचा लाभ देण्यास ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.

१५. सदर योजनेचा लाभ मिळणेकामी दिलेल्या मुदतीत विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

१६. अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीची आढळल्यास सदर योजना लाभ देण्यात येणार नाही.

१७. सदर योजनेचा लाभ मिळणेबाबत विद्यार्थी खेळाडूस हक्क सांगता येणार नाही.

१८. सदर योजनेचा लाभासाठी अर्ज Online म.न.पा. च्या सांकेतीक स्थळावर किंवा क्रीडा व सांस्कृतीक विभागात उपलब्ध करुन देण्यात येईल.

१९. विविध खेळात प्राविण्य मिळविले तरी, क्रीडा शिष्यवृत्ती एकदाच देय राहील.

२०. योजनेचे धोरण, नियम व अर्टीमध्ये बदल करण्याचा अथवा वाढ किंवा घट करण्याचा अथवा शिथिल करण्याचा अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना राहील.

२१. अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीची आढळल्यास आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही. फसवणूक करून आर्थिक सहाय्य घेतल्यास ती कायदेशीर कारवाई करून वसूल केली जाईल.

महत्वाचे नियम

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खुल्या वरिष्ठ गटातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य अथवा क्रीडा शिष्यवृत्ती यासाठी संबंधित खेळ संघटनेचे प्रमाणपत्र यांचे झेरॉक्स प्रत सत्यप्रत करुन सादर करणे आवश्यक आहे.

अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीची आढळल्यास आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही. फसवणूक करुन आर्थिक सहाय्य अथवा क्रीडा शिष्यवृत्ती घेतल्यास ती कायदेशीर कारवाई करुन वसूल केली जाईल.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खुल्या वरिष्ठ गटातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य अथवा क्रीडा शिष्यवृत्ती घेणेपूर्वी संबंधित खेळाडूने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विहित नमून्यात करारनामा करुन द्यावा लागेल.

अधिक संपर्क:

क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, तिसरा माळा,छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन्स, नागपूर-४४०००१

– उज्ज्वला चरडे मो .- 9823040939

– शुभम सुपारे मो.नं .- 9623727213