कोराडी पोलिसांची यशस्वी कारवाई: घरफोडी प्रकरणातील आरोपी अटकेत; ६.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
194

 

नागपूर १८ –  कोराडी पोलिसांनी एक मोठी कामगिरी करत घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून ६,१२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर घटना १ जुलै २०२५ रोजी रात्री २ वाजता ते ४ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली.

फिर्यादी मिर माजीद अली (वय ५४), रा. तिरुपती नगर, शंभुनगर, कोराडी हे आपल्या कुटुंबासह यवतमाळला गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप व कडीकोडा तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी आलमारी फोडून १.६० लाख रुपये रोख रक्कम तसेच सोन्या-प्लॅटीनीयमचे एकूण ५.६४ लाख रुपयांचे दागिने असा एकूण मुद्देमाल चोरून नेला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी संबंधित प्रकरणी भा.दं.वि. कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कुलदीपसिंग ज्योतसिंग बडोले (वय ३०), रा. सोरापाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल मिळवला असून एकूण जप्त रक्कम ६.१२ लाख रुपये इतकी आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहाय्यक पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त निकेतन कदम, व सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यविर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक पोपट धायतोंडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद मातरे, उपनिरीक्षक आशिष मोरखडे, पो.अं. प्रताप शेळके, गणेश साहुसाकडे, सागर यादव आणि क्षितिज चौरसिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुढील तपास सुरू आहे.