नागपूर :- “प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यांत मला एक चमक दिसली. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ही मुले निश्चितच पुढे जाऊ शकतात,” या शब्दात मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी विद्यार्थ्यांमधील क्षमतेवर आपला विश्वास व्यक्त केला.
‘नन्हे सितारे’ या जीवन कौशल्यांवर आधारित उपक्रमाच्या महानगरपालिका स्तरीय अंतिम फेरीच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याचे आयोजन नागपूर महानगरपालिका, जे. सी. फ्लावर्स, पर्सिस्टन्ट फाउंडेशन आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (OLF) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाला मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्यासह उपशिक्षणाधिकारी संजय दिघोरे, दुर्गानगर माध्यमिक शाळेचे मुख्यध्यापक कृष्णा उजवणे. ओएलएफच्या महाराष्ट्र प्रमुख चित्रा खन्ना यांच्यासह इतर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना साधना सयाम म्हणाल्या की, केवळ पुस्तकापुरते शिक्षण पुरेसे नाही, मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर अनुभवाधारित, कौशल्यप्रधान आणि संवेदनशील शिक्षण महत्त्वाचे आहे आणि नन्हे सितारे सारखे कार्यक्रम त्यात भर घालत आहेत. सरकारी शाळांमधील हुशार, जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री आणि पाठबळ शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे, हे अधोरेखित करत त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व नमूद केले. तसेच, बालवाडी शिक्षकांकडून सुरू असलेल्या उत्कृष्ट कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले. हे सकारात्मक आणि परिणामकारक कार्य पालकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवले गेले पाहिजे, जेणेकरून सरकारी शाळांवरील पालकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही त्या म्हणाल्या.
‘नन्हे सितारे’ या उपक्रमाचा उद्देश केवळ स्पर्धा आयोजित करणे इतकाच मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास, आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या या उपक्रमाला महानगरातील शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा आणि तालुका स्तरावरील प्राथमिक फेऱ्यांमधून 60 विद्यार्थ्यांची ग्रँड फिनालेसाठी निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे योग्य, पारदर्शक आणि न्याय्य मूल्यमापन व्हावे, यासाठी शिक्षण, साहित्य आणि कायदा क्षेत्रातील अनुभवी व प्रतिष्ठित व्यक्तींनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. या परीक्षकांमध्ये अनुपमा हुँगे, डॉ. कीर्ति पालटकर, डॉ. आश्विन किनारकर, डॉ. शिल्पा सूर्यवंशी, प्रसेनजीत गायकवाड आणि भूपेश चव्हाण यांचा समावेश होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील सादरीकरणांचे मूल्यमापन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता १ ते ३, ४ ते ५, आणि ६ ते ८ अशा चार गटांमध्ये कवितापठन, स्पोकन इंग्लिश, कथा सादरीकरण आणि कविता वाचन या तीन प्रमुख प्रकारांत विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. कवितापठन स्पर्धेत इयत्ता १ ते ३ मधून जान्हवी विश्वकर्मा हिने प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता ४ ते ५ मध्ये तृकशा कठाले हिने प्रथम तर आयुषी निंबालकर हिने द्वितीय क्रमांक मिळवला, तर इयत्ता ६ ते ८ मधून रिया वानरे हिने बाजी मारली. स्पोकन इंग्लिश या प्रकारात इयत्ता १ ते ३ मधून अनन्या पांडे, इयत्ता ४ ते ५ मधून मानसी नगरिकर, तसेच इयत्ता ६ ते ८ मधून नाहिद फातिमा आणि स्वाती पटेल यांनी विजेतेपद मिळवले. स्पेलिंग बी स्पर्धेत इयत्ता ४ ते ५ मधून जितेंद्र पांडे, गौरव मिश्रा आणि आरव भूपेन्द्र शेंडे, तर इयत्ता ६ ते ८ मधून समीक्षा उगराज यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला. कथाकथन स्पर्धेत इयत्ता १ ते ३ मधून दिशा गोसावी, इयत्ता ४ ते ५ मधून आफरीन परवीन आणि दिव्याशी प्रमोद नायक, तसेच इयत्ता ६ ते ८ मधून अश्विन तिवारी आणि अनामिका प्रजापती यांनी आपली प्रतिभा सिद्ध करत पारितोषिके मिळवली.
या प्रसंगी ओएलएफच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख श्रीमती चित्रा खन्ना यांनी सांगितले की, जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या भक्कम पाठबळाशिवाय हा उपक्रम यशस्वी होणे शक्य नव्हते. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचे व शिक्षण विभागाचे आभार मानत संपूर्ण ‘विनोबा’ टीमच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओएलएफचे कम्युनिटी डेव्हलपमेंट मॅनेजर विजय वावगे यांनी आपल्या टीमसह केले. प्रोग्राम मॅनेजर विशाल डहाट, प्रोजेक्ट ऑफिसर्स निखिल गजभिये, निलेश नागपुरे व प्रणय देशभ्रतार यांच्यासह संपूर्ण ओएलएफ चमूने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
‘नन्हे सितारे’ ही स्पर्धा नागपूर महानगरात राबवण्यात येणाऱ्या “आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम” अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षकांचे सक्षमीकरण करणे आणि नवोपक्रमशील अध्यापनाला चालना देणे हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. ‘विनोबा ॲप’मुळे शिक्षक आणि प्रशासन यांच्यात सुलभ संवाद शक्य झाला असून, यामुळे प्रक्रियाही अधिक सोप्या झाल्या आहेत. ‘नन्हे सितारे’सारखे उपक्रम ही याच सामूहिक प्रेरणा आणि शिक्षण प्रक्रियेची फलश्रुती आहे.
विनोबा कार्यक्रम -औपचारिकरित्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्य कार्यक्रम म्हणून ओळखला जाणारा-सध्या महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कार्यरत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत ६०,२४५ शाळांपर्यंत पोहोच साधली असून, जवळपास १,९६,४७८ शिक्षकांना सातत्याने पाठबळ देण्यात आले आहे. याचा लाभ ४० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना झाला आहे.
या उपक्रमाद्वारे ओपन लिंक्स फाउंडेशन शिक्षण विभागांसोबत घनिष्ठ समन्वयाने काम करत असून, तंत्रज्ञान आणि वर्तनविज्ञानाच्या प्रभावी वापरातून शिक्षकांना सक्षम करत आहे. चिल्ड्रन फस्त (Children First) या स्पष्ट दृष्टीकोनासह, शालेय शिक्षणात दीर्घकालीन आणि प्रणालीगत सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.



