पोलिस समुपदेशन क्षेत्रात पहिल्यांदाच एकत्रित प्रशिक्षणाचा उपक्रम

0
168

नागपूर १८ – ग्रामीण भागात महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक अत्याचार, छळ आणि तणाव यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आता महिला पोलीस समुपदेशकांना एकत्रित तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. गडचिरोली, अमरावती आणि नागपूर पोलिस परिक्षेत्रातील ग्रामीण महिला पोलीस समुपदेशकांचे प्रशिक्षण येत्या शुक्रवारपासून नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात सुरू होणार आहे.

राज्यातील ‘भरोसा सेल’ या उपक्रमाने महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि पत्नीपीडितांसाठी महत्त्वपूर्ण मदतीचा हात दिला आहे. कौटुंबिक वादांमुळे उध्वस्त होणाऱ्या कुटुंबांना नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प २०१७ मध्ये नागपूरमध्ये यशस्वीरित्या सुरू झाला आणि २०१९ पासून संपूर्ण राज्यात राबविला जात आहे. आता ग्रामीण भागातील महिलांनाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी व दुर्गम भागात भरोसा सेल विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अंतर्गत, गडचिरोली, अमरावती आणि नागपूर पोलिस परिक्षेत्रातील १४ युनिट्समधील ५० अधिकारी आणि ५० महिला समुपदेशकांना एकत्रित प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा असा प्रथमच उपक्रम आहे, ज्यामध्ये भरोसा सेलमध्ये नियुक्त समुपदेशकांना विभागीय आणि राज्य पातळीवर एकत्रितपणे मार्गदर्शन दिले जाईल.

प्रशिक्षणामध्ये प्रत्येक भरोसा सेलमधील १ प्रभारी अधिकारी आणि २ महिला अंमलदार सहभागी होणार असून, त्यांना समुपदेशन कौशल्य, मानसोपचार, कायदेशीर सल्ला, तणाव व्यवस्थापन, संवाद कौशल्य यासंबंधी तज्ज्ञांकडून शास्त्रीय मार्गदर्शन दिले जाईल.

भरोसा सेलची सात प्रमुख सेवा :

  • पोलीस मदत

  • समुपदेशन

  • मानसोपचार सेवा

  • वैद्यकीय मदत

  • कायदेशीर सल्ला

  • संरक्षण

  • पुनर्वसन सेवा

या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागात कार्यरत महिला समुपदेशक अधिक सक्षम होतील आणि पिडीत महिलांशी अधिक प्रभावी संवाद साधू शकतील. त्यांचे मानसिक आणि सामाजिक पुनर्वसन अधिक सशक्त पद्धतीने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे राज्यातील महिला सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे.

@fillephoto