– झांशी राणी मैदान ग्रुपचा उपक्रम, शहरातील सर्वांग सुंदर मैदान बनवू – जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहाण
यवतमाळ :- उमरसरा परिसरातील न्यू गिलाणी नगर व दहिवलकर लेआउट यांच्या संयुक्त विद्यमाने झांशी राणी मैदान ग्रुपतर्फे भाजपाच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवक यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला झांशी राणी प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तर पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहाण, प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते हरीहर लिंगनवार तसेच नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी, नगरसेवक पंकज देशमुख, मुकेश इंगोले, सभापती रिता गजानन धावतोडे, अर्चना दिनेश चिंडाले, चंदु चौधरी, पंकज नानवाणी, झांशी राणी मैदान ग्रुपचे अध्यक्ष किसन बडवने आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ सदस्य माणिकराव मस्के यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी यांचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. हे मैदान दुर्लक्षित होते. कच-याचे मैदान म्हणून ओळख होती. मात्र परिसरातील महिलांनी अहोरात्र परिश्रम करून मैदानाचे रुप पालटले. पंकज नानवाणी यांच्या असोसिएशनने पुढाकार घेऊन सुंदर मैदान बनविण्यात आले आहे. तसेच ग्रुपच्यावतीने या मैदानावर झाडे लावण्यात आली. माजी मंत्री मदन येरावार, पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने मैदान जसे काही एखाद्या नवरीसारखे थाटल्याचे दिसते. त्यामुळे येरावार आणि राठोड यांचे मनापासून धन्यवाद.
जनावरांचा त्रास असल्यामुळे रोलिंग गेट तसेच नालिची दुर्गंधी येत असल्यामुळे अंडरग्राउंड नाली, मॉर्निंग वॉक साठी पावसाळ्यात येणा-यांची फजिती होते त्यामुळे शेडची व्यवस्था करावी, प्रास्ताविकामधून ह्या बाबी मस्के यांनी अध्यक्षांसमोर ठेवल्या. महिलांच्या सहका-याने ह्या मैदानाचे पुर्णत: रुप पालटल्याने मैदानाला झांशी राणी मैदान असे नाव देण्यात आले. यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रफुल्ल चौहाण अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना म्हणाले की, मैदानाला सहा नगरसेवक मिळाले आहेत. त्यामुळे विकासासाठी कुठलीच अडचण जाणार नाही, आपण समाजमंदिर देतो मात्र त्याचे मॅन्टेनस राहत नाही. निधी देतो शंभर टक्के मात्र त्याचा उपयोग झाला पाहिजे, नगरसेवकांचा पुन्हा एक वर्षाने सत्कार घ्या कारण की, सद्यपरिस्थितीत नवनिर्वाचीत असल्यामुळे हनीमुन पीरेडवर आहे. त्यामुळे दिलेल्या सुचना नोट डाऊन करण्याचे आदेश यावेळी नगरसेवकांना देण्यात आले. तसेच कुठलाही विकास करायचा असेल तर पाठपूरावा अत्यंत आवश्यक असतो, या ठिकाणी बालगोपालांना खेळण्यासाठी म्हणून नाना-नानी पार्क बनविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. तसेच पार्किंगचीही व्यवस्था करून देऊ नगरसेवक हो ला हो म्हणतात त्यांच्याकडून काम करून घेणे महत्त्वाचे असते. मी पण ह्या मैदानात फिरत असल्यामुळे एक नागरिक म्हणून बोलत आहे. मैदानाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मार्चच्या डिपीडीसीमध्ये निधी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन चौहाण यांनी यावेळी दिले. दरम्यान, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवक यांचा झांशी राणी मैदान ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके, उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी, हरीहर लिंगनवार, पंकज नानवाणी, लोकेश इंगोले, चंदु चौधरी, महिला बाल विकास विभागाच्या अधिकारी मीनल जगताप, किसनराव बडवने आदींची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रदीप पवार, वसंतराव सरागे यांनी तर आभार श्रीराम बाकमवार यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.








