नागपूर १८ : गुन्हेशाखा युनिट क्र. ५ च्या पथकाने पारडी पोलीस ठाणे हद्दीत मोठी यशस्वी कारवाई करत १०६ किलो ८५० ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे. दिनांक १७ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ ते रात्री ८.५० या वेळेत पोहवा. राजेंद्र टाकळीकर यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने भंडारा-हैद्राबाद हायवेवरील उमिया वसाहतजवळ महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या मागे आयशर ट्रक (क्र. MH 40 BG 6034) थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ताज हबीब शेख मोहम्मद (२७, रा. वाकी, सावनेर) आणि शैलेन्द्र रामलखन गुप्ता (२८, रा. यादव नगर, यशोधरानगर) हे दोघे आरोपी सापडले. ट्रकमधून सुमारे ₹२६.७१ लाख किमतीचा १०६ किलो ८५० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन, भाजी विक्रीचे कॅरेट, आयशर गाडी व इतर साहित्य असा एकूण ₹४१.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी हा गांजा मोहसीन उर्फ फिरोज (रा. यशोधरानगर), छोटू आणि वांगू या फरार आरोपींसोबतच्या संगनमताने वाहतूक करत असल्याची कबुली दिली. आरोपींच्या विरोधात एन.डी.पी.एस. कायद्यातील कलम ८(क), २०(ब)(२)(क), २९ अन्वये पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. संदीप बुआ, पोउपनि. राहुल रोटे, पोहवा. राजेंद्र टाकळीकर, अनीस खान, रूपेश नानवटकर, नापेअं. गणेश ठाकरे, प्रविण भगत, पोअं. दिपक बावनकर, विशाल नागभिडे, देवचंद थोटे, आशिष पवार, योगेश महाजन व सुनिल यादव यांनी केली. नागपूर गुन्हे शाखेची ही महत्त्वपूर्ण कारवाई अमलीपदार्थ विरोधी मोहिमेतील एक मोठे यश मानले जात आहे.



