खापा, वार्ताहर :- सावनेर पारशिवणी राष्ट्रीय महामार्गावरील खापा येथील कन्हान नदीच्या पुलावरून पहाटे सुमारे चार वाजता दरम्यान एक मालवाहू आयशर ट्रक उलटल्याची घटना (दि. २) सोमवार रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश येथून नागपूर येथे मक्का घेऊन आयशर वाहन क्र. एम पी २८ जी ३७५४ जात होते. बेडगाव मार्गे खापाच्या दिशेने येत असताना कन्हान नदीच्या पुलावरून पहाटे चारच्या दरम्यान सदर वाहन खाली कोसळून गंभीर अपघात झाला. या अपघातात पवन सूर्यवंशी (वय ३५ वर्ष) व विजय धुर्वे (वय २५ वर्ष) दोघेही रा. बिचवा, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश दोघेही जखमी झाले.

घटनेची माहिती त्वरित खापा पोलिसांना देण्यात आली. तसेच घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आणि पोलीस घटनास्थळी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. अंधारात टॉर्चच्या प्रकाशात जखमींना त्वरित बाहेर काढत सावनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. पुढील तपास खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात खापा पोलीस करीत आहे.



