हरभरा पिकावरील घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाचा सल्ला

0
44

नागपूर :- हरभरा पीक फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत असून या दरम्यान अळीचा प्रादुर्भाव संभवतो. हरभरा पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने घाटे अळीच्या व्यवस्थापनाबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या किटकशास्त्र विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने यासंदर्भात कळविले आहे.

हरभऱ्याचे पीक हे सध्या फुलोरा अवस्थेत असून घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मादी पतंग सुरुवातीला पिकाच्या पानांवर तसेच कोवळया शेंडयावर एकेरी अंडी घालते. दोन ते तीन दिवसात अळी बाहेर पडते. त्यामुळे पाने पिवळसर होऊ न वाळतात व गळून पडतात. मोठया झालेल्या अळया संपूर्ण पाने खाऊन टाकतात. त्यामुळे फांदयाच शिल्लक राहतात. तसेच पीक फुलोऱ्यावर आल्यावर अळया छिद्र करुन आतील दाणे खाऊन घाटे पोखरुन नुकसान करतात. या प्रकारच्या अळीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजनाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या अळीचा प्रादुर्भाव एकाच वेळी आढळून येतो म्हणून शेतातील पीकांमध्ये मादी पतंगाने अंडी घालू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फवारणीचा सल्ला देण्यात आला आहे. निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एच.ए.एन.पि.व्हि 500 एल.ई किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी, 20 मिली पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. तसेच दुसरी फवारणी आवश्यकता वाटल्यास 15 दिवसांच्या अंतराने करावी. ईथिऑन 50 टक्के ईसी 25 मिली किंवा इमामेक्टीन बेझोएट 5 टक्के एस जी 4 ग्रॅम, स्पिनेटोरम 11.70 टक्के एससी 9 मिली, क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल 18.5 एससी 3मिली, इंडोक्झाकार्ब 15.80 इसी 6.6 मिली, लंबडा सायहेलोथ्रीन 0.5 इसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी,असा सल्ला देण्यात आला आहे.