राष्ट्रीय पातळीवरील ‘पोलिस ड्युटी मिट’च्या आयोजनाचा सन्मान यंदा नागपूरला!

0
70

– २८ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होणार आयोजन

नागपूर :- नागपूर- वैज्ञानिक आणि आधुनिक पद्धतीने गुन्ह्यांचा तपास, किचकट स्वरुपाच्या गुन्ह्यांची उकल करण्याची सर्वोत्तम क्षमता, शिस्तबद्ध कार्यप्रणाली तसेच पोलिसांनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा कस पाहणारी अखिल भारतीय स्तरावरील ६९ वी ‘पोलिस ड्युटी मिट’ (AIPDM) म्हणजेच ‘पोलिस कर्तव्य मेळावा’आयोजित करण्याचा मान यंदा महाराष्ट्र पोलिस दलास मिळाला असून नागपुरात याचे आयोजन होणार आहे. पोलिस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन नागपूर पोलिस दल आणि स्टेट सीआयडी करणार आहे. ही ‘पोलिस मिट’ २८ मार्च ते २ एप्रिल या कालावधित आयोजित होणार असून त्यात देशभरातील विविध राज्यांतील पोलिस दले तसेच निमलष्करी पोलिस दले तपासाच्या विजेतेपदासाठी आपले कौशल्य पणाला लावतील. विशेष म्हणजे १९५३ साली प्रथम नागपुरातच अशा प्रकारची ‘पोलिस मिट’ आयोजित करण्यात आली होती.

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात रांची (झारखंड) येथे ६८ व्या अखिल भारतीय ‘पोलिस ड्युटी मिट’चे आयोजन झाले होते. ही मिट एकप्रकारची स्पर्धाच आहे. त्यात नऊ प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यात लेखी परीक्षेचाही समावेश असतो. या स्पर्धा प्रामुख्याने गुन्हे उकलण्यात वापरले जाणारे शास्त्रीय पद्धतींचे ज्ञान, गुन्हे तपासात न्यायसहायक (फॉरेन्सिक) विज्ञानाचा वापर, फिंगरप्रिंट विश्लेषण, दस्तऐवज परीक्षणांचे तंत्र, सायबर फॉरेन्सिक तंत्र, घटनास्थळाची तपासणी, व्हिडिओ-फोटोग्राफी, श्वान पथकांची कामगिरी तसेच डिजिटल पुरावा संकलन या विषयांवर आधारित असतात. या स्पर्धेत पथकांसाठी गुन्हे तपासासाठी गुन्ह्याची काल्पनिक घटना निर्माण केली जाते. त्यात सहभागी होऊन पथके आपले कौशल्य पणाला लावतात. पथकांच्या कामगिरीचे बारकाईने मूल्यांकन करून विजेत्या पथकांची निवड केली जाते.

दरवर्षी राज्यस्तरावरही अशा पोलिस ड्युटी मिटचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रस्तरीय पोलिस ड्युटी मिटमध्ये (MSPDM) मागील सलग दोन वर्षांत (२०२४ आणि २०२५) नागपूर पोलिसांनी तपासाचे उत्कृष्ट कौशल्य दाखवत आपले वर्चस्व सिद्ध करून पहिला क्रमांक पटकावला आहे. यात नागपूर पोलिसांनी वैज्ञानिक तपास, न्यायसहायक (फॉरेन्सिक) तपासातील समज तसेच गुन्ह्यांची अचूक उकल करण्याची उच्चस्तरीय क्षमता सिद्ध केली होती. २०२५ मधील महाराष्ट्र पोलिस ड्युटी मिटमध्ये नागपूर शहर पोलिसांनी एकूण १५ पदके पटकावली आहेत. त्यात ६ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश होता. सोबतच जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी, वैज्ञानिक तपास ट्रॉफीही पटकावली आहे.

अखिल भारतीय पोलिस ड्युटी मिट आयोजित करण्याच्या इतिहास नागपूरपासूनच सुरु होतो. १९५३ साली सर्वप्रथम नागपुरातच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही मिट रायफल आणि रिव्हॉल्वर शूटींग स्पर्धेपुरती मर्यादित होती. मात्र, त्यानंतरच्या काळात त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली. आता ती व्यापक आणि विस्तृत स्वरुपात आयोजित केली जाते. अत्यंत बारकाईने तपासल्या जाणाऱ्या तांत्रिक कौशल्यांच्या माध्यमातून देशातील पोलिसांच्या सर्वोत्तम क्षमतांची राष्ट्रीय कसोटी या मिटमध्ये घेतली जाते. या मिटमध्ये विविध राज्यांच्या पोलिस पथकांसह केंद्रीय दलांची पथकेही सहभागी होतात.