कामठी :- कामठी शहरातील नागपूर–जबलपूर मार्गालगत असलेल्या चंद्रमणी नगर परिसरात मेट्रोचे काम सुरू असून, त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टीनाच्या कंपाऊंडमधून पळत सुटलेले सुमारे एक ते दोन वर्षे वयाचे जखमी हरीण थेट एका नागरिकाच्या घरात शिरल्याची घटना आज सकाळी घडली.
चंद्रमणी नगर येथील रहिवासी हर्षद आढाऊ यांच्या घरात अचानक हरीण शिरल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने याबाबत पोलिस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस विभागाने त्वरित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले.
सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास वन विभागाचे राऊंड ऑफिसर अमोल गिरी यांच्यासह कर्मचारी श्रीकृष्ण अस्वले व बंडूजी मगर यांनी घटनास्थळी भेट देत हरीण सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. त्यानंतर जखमी हरीणास नागपूर येथील सिव्हिल लाईन परिसरातील टी.सी.सी. सेंटर, सेमिनरी हिल्स येथे नेऊन उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, कामठी शहर व परिसरात अशा घटना नवीन नाहीत. सैनिक छावणी परिसर सुमारे ६०० एकरांहून अधिक क्षेत्रात पसरलेला असल्याने येथे मोर, जंगली डुक्कर, हरीण, सर्प आदी वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आढळतो. कधीकधी ही वन्यजीव नागपूर–जबलपूर महामार्गावर येतात. त्यामुळे वाहनचालकांमुळे तसेच भटक्या कुत्र्यांमुळे या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वन्यप्राणी व मानवी वस्ती यांचा वाढता संघर्ष लक्षात घेता, संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.



