कळमना रोडवरील अपघातातील गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
75

कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी–कळमना मार्गावरील खुशबू मोटर्ससमोर २९ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारास झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहनावाज परवेज मोहम्मद शबाब (वय २५, रा. कामगार नगर, कामठी) असे मृतक तरुणाचे नाव आहे.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहनावाज परवेज मोहम्मद शबाब व त्याचे दोन मित्र तसलीम खान (वय २४, रा. बीबी कॉलनी, येरखेडा) आणि सोहेल खान (वय २५, रा. कामठी) हे तिघेही नागपूर शहरातील एका नातेवाईकाच्या विवाह समारंभातून सहभागी होऊन चारचाकी वाहन क्रमांक एमएच १४ एफसी ४५५८ ने बीबी कॉलनी, येरखेडा येथील घरी परतत होते.

कामठी–कळमना मार्गावरील खुशबू मोटर्ससमोर मागील दिशेने कामठीहून कळमना कडे जाणाऱ्या कार क्रमांक एमएच ३९ डी २४५० च्या चालकाने वाहन निष्काळजीपणे व अनियंत्रितपणे चालवून पुढे जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत संबंधित कार रस्त्याच्या कडेला खाली उतरून झाडावर आदळली. अपघातात कारमधील तिघेही तरुण जखमी झाले.

शहनावाज परवेज याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला कळमना मार्गावरील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. अपघातातील किरकोळ जखमी तसलीम खान व सोहेल खान यांच्यावर उपचार करून डॉक्टरांनी सुट्टी दिली होती.

या प्रकरणी मृतकाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात कलम १०६ (२), १२८ (१), १२५ (अ), ३२४ (४) भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ व १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर महंत करीत आहेत.