– घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर उघड
कामठी :- नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोरपड गाव येथील ‘ड्युएट पिपल कॅफे’ वर पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकली. या कारवाईत हॉटेलमध्ये घरगुती वापराचे गॅस सिलिंडर बेकायदेशीरपणे वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी मुद्देमालासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, घोरपड रोडवरील ‘ड्युएट पिपल कॅफे’मध्ये शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून व्यावसायिक कामासाठी स्वस्त दरातील घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात होता. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९:५५ ते १०:४५ च्या सुमारास अचानक छापा टाकला. यावेळी कॅफेचा मालक अक्षय निलकंठ ढोक (वय २८ वर्षे, रा. घोरपड गाव) हा घरगुती सिलिंडर वापरून ग्राहकांना खाद्यसेवा पुरवताना रंगेहाथ मिळून आला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ४५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये एच.पी. कंपनीचे दोन घरगुती गॅस सिलिंडर (किंमत ५,८०० रुपये) एक मोठ्या आकाराची तीन चुल्ह्याची शेगडी (किंमत ४०,००० रुपये),
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अक्षय ढोक याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, परिमंडळ क्र सहा चे डीसीपी संदीप पखाले,एसीपी अंकूश खेडकर,पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश पठाडे, किशोर महंत, सुरज ठाकूर,श्याम गोरले,मिथुन शेरे, पुरवठा निरीक्षक पंकज पंचभाई, लिपिक प्रेम खूपसे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.








