पांढरकवडा :- राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळखुटी गावाजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस दिलेल्या जबर धडकेत ३० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आकाश दौलत किनाके (३०) रा. खैरगाव (दे) असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश हा घरातून तेलंगणातील पेंढरवाडा येथे जाणार असल्याचे सांगून द्चाकीवरून निघाला होता. रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास पिंपळखुटी गावाजवळ त्याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की,आकाशच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, गावातील एका होमगार्ड ने अपघाताची माहिती मोबाईलद्वारे आकाशच्या कुटंबीयांना दिली. जखमी अवस्थेत त्याला तातडीने पांढरकवडा येथील उपजिल्हा रुणालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले, या घटनेप्रकरणी मारोती दौलत किनाके यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुदैवी घटनेमुळे किनाके कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भरधाव वाहनाची दुचाकीस्वारास धडक; युवकाचा मृत्यू
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.