देशांतर्गत आव्हानांनी जर्जर झालेल्या इस्रायली व अमेरिकी राष्ट्रप्रमुखांस थारेपालटाची गरज होती. म्हणून या युद्धाचा घाट घातला गेला, हे वास्तव…
प्रत्येक बेमुर्वतखोर, बेजबाबदार नेत्याच्या आयुष्यात एक क्षण असा येतो तेथून त्याची कारकीर्द झपाट्याने उतरणीस लागते. इराणवरील हल्ल्याचा निर्णय हा क्षण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीचा असा मध्यबिंदू असेल. असे ठामपणे म्हणता येते याचे कारण स्वत:च्या नसलेल्या युद्धात ट्रम्प यांनी अमेरिकेस ओढले आणि इस्रायलचे पंतप्रधान नरसंहारकारी बेंजामिन नेतान्याहू यांचा नवस फेडण्याची जबाबदारी स्वत:च्या डोक्यावर घेतली. इस्रायल स्वत:चे युद्ध लढू शकत नाही हा आतापर्यंतचा इतिहास आहे. अमेरिकेने पाठकुळी घेतल्याखेरीज इस्रायल चार पावलेही चालू शकत नाही, हादेखील याच इतिहासाचा भाग. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली. गेल्या वर्षी डिसेंबरपासून नेतान्याहू यांनी इराणवर हल्ला करण्यासाठी ट्रम्प यांच्यामागे भुणभुण लावलेली होती. त्याच वेळी ट्रम्प हे इराणशी वाटाघाटींतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात होते. आताही गेल्याच आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यात कराराच्या चर्चेची फेरी झाली. ती यशस्वी होण्यात युद्धखोर नेतान्याहू यांचे अपयश दडले होते. कोणत्याही परिस्थितीत अमेरिका आणि इराण यांच्यात करार होऊ नये हा नेतान्याहू यांचा प्रयत्न होता.
आपल्याकडे बोफोर्स, टू जी घोटाळा हे जितके सत्य तितकेच इस्रायलमध्ये ‘इराणी अणुबॉम्ब’ हे राजकीय सत्य आहे. खरे तर इराण अणुबॉम्ब बनवत नाही असे प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगापासून अनेकांनी दिलेले असतानाही या इराणी अणुबॉम्बच्या धोक्याचे तुणतुणे नेतान्याहू वाजवत असतात. कारण विख्यात ब्रिटिश इतिहासकार सॅम्युएल जॉन्सन म्हणून गेला त्याप्रमाणे कोणत्याही बदमाशाप्रमाणे देशभक्ती हा नेतान्याहू यांचाही शेवटचा आसरा आहे. त्याचा पाया अन्यांच्या प्राणावर बेतलेला असल्याने कोणाचे ना कोणाचे तरी प्राण घेत राहणे हे नेतान्याहू यांच्यासाठी गरजेचे आहे. इराणी युद्धाचा घाट त्यासाठी.
तो नेतान्याहू यांनी घातला आणि ट्रम्प त्या सापळ्यात नेहमीप्रमाणे पूर्ण अडकले. नेतान्याहू आणि सौदी अरेबियाचा भावी राजा महंमद बिन सलमान ‘एमबीएस’ यांनी हे युद्ध अमेरिकेवर कसे लादले याचे साद्यंत साधार वृत्तांत अनेक नामांकित अमेरिकी माध्यमांनी गेल्या दोन दिवसांत छापले. तेथील माध्यमे आपले नियतकर्तव्य करत असल्यामुळे टकर कार्लसनसारख्या कडव्या उजव्या ट्रम्पवाद्यासही या युद्धाचे समर्थन करणे अशक्य झाले. ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्या जाळ्यात अडकू नये असेच मत टोकाचा उजवा असूनही त्याचे आहे. ही बाब त्या देशातील उजव्यांत तरी काही शहाणपण शिल्लक असल्याचे दर्शवते. म्हणून ती कौतुकास्पदही ठरते. वास्तविक इतिहासात खुद्द ट्रम्प आणि वर्तमानात त्यांचे विद्यमान सहकारी – परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांचेही असेच मत होते/आहे. अध्यक्षपदी बराक ओबामा असताना ट्रम्प यांनी पश्चिम आशियात कोणत्याही नव्या युद्धात अमेरिकेने सहभागी होऊ नये असे मत जाहीरपणे व्यक्त केले होते आणि ओबामा हे अमेरिकेस युद्धाच्या खाईत लोटतील अशी आवई उठवली होती. प्रत्यक्षात ओबामा यांनी इराणशी करार केला आणि विरोधात असताना व्यक्त केलेल्या भूमिकेच्या बरोबर उलट करत ट्रम्प यांनी अमेरिकेवर युद्धे लादली. आधी व्हेनेझुएलाचे. आता इराणचे. कारण नेतान्याहू यांच्याप्रमाणेच त्यांनाही युद्धाची तीव्र गरज होती. एपस्टीन फाइल्स, सर्वोच्च न्यायालयाने आयातशुल्क बेकायदा ठरवून दिलेला दणका आणि मुख्य म्हणजे अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मध्यावधी निवडणुका आदी आव्हान-वेदनांपासून ट्रम्प यांस मुक्ती हवी होती. तशी संधी नेतान्याहू यांनी दिली. हे सत्य सोमवारच्या पत्रकार परिषदेत रुबियो यांच्या तोंडून निघून गेले. इस्रायलमुळे अमेरिका या युद्धात ओढली गेली अशा अर्थाचे विधान रुबियो यांनी केले. देशांतर्गत आव्हानांनी जर्जर झालेल्या दोन राष्ट्रप्रमुखांस थारेपालटाची गरज होती. म्हणून या युद्धाचा घाट घातला गेला, हे वास्तव.
इराण कितीही आव आणला तरी अमेरिका-इस्रायलला आव्हान देऊ शकत नाही, हे त्रिवार सत्य. पण आपल्याकडील दोन हजारांहून अधिक विविध क्षेपणास्त्रांच्या मार्याने या दोहोंस नाही तरी या दोघांच्या मित्र-देशांत सहज विध्वंस घडवू शकतो. तेच त्याने केले. अमेरिका-इस्रायल यांस थेट प्रत्युत्तर देता देता अमेरिकेच्या अनेक बगलबच्च्या देशांवर इराणने बेछूट क्षेपणास्र मारा सुरू केला असून त्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढलेली आहे. हे सर्व देश ऊर्जासंपन्न. त्यांच्यावर हल्ला करणे म्हणजे जगाची ऊर्जाव्यवस्था अस्थिर करणे. म्हणजेच आपल्या जखमांच्या वेदना इतरांनाही सहन करायला लावणे. इराणच्या जखमा रक्ताळलेल्या तर इतरांच्या आर्थिक. हे इराणचे दग्धभू धोरण. त्याचा फटका संपूर्ण जगाला बसणार असून हे जगाचे दाबले जाणारे नाक अनेकांस अमेरिकेविरोधात तोंड उघडायला लावणार हे उघड आहे. परत इराणमध्ये ‘राजवट बदल’ करायचा म्हणजे काय आणि कसा हा प्रश्न अमेरिकेसमोर अनुत्तरितच राहतो. खामेनी हे शेजारील इराकमधील सद्दाम हुसेनइतके नाहीत तरी लोकशाहीविरोधी होते, हे खरे. त्यांची राजवट ्त्रिरयांविरोधात अत्याचारी होती हेही खरे. पण त्याच्या पदच्युतीची मागणी करणारे हे दोघे कोण मोठे संतसज्जन आहेत हा प्रश्नही तितकाच खरा. इस्लामी कट्टरपंथीयांप्रमाणे इस्रायलमधील यहुदी (ज्यू) धर्मीयदेखील महिलांबाबत तितकेच- किंबहुना अधिकच- अत्याचारी आहेत हेही तितकेच खरे. ही असली बोगस कारणे पुढे करत अमेरिकेने आतापर्यंत अनेक देशांत राजवट बदल घडवून आणले. गेल्या शतकातही इराण, इराक, ग्वाटेमाला, निकाराग्वा, लिबिया, सीरिया अशी किती देशांची उदाहरणे सांगावीत. या देशांत आता कशी रामराज्ये नांदतात ते आपणासमोर आहे.
तरीही तसेच बोगस कारण पुढे करत अमेरिकेने हे नवे युद्ध सुरू केले आणि त्यासाठी नेतान्याहू यांच्यामागे फरपटत जाणे स्वीकारले. ट्रम्प-नेतान्याहू हे दोन ‘राक्षसगण’ नेते जगास विध्वंसाच्या वाटेवर नेत आहेत. गेल्या दोन दिवसांतील आर्थिक घडामोडी तेच दर्शवतात.