बोखारा येथे मूकबधिर फुटबॉल स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

0
66

कोल्हापूर विजेता, मुंबई उपविजेता

नागपूर २२ – बोखारा येथील स्लम सॉकर अकादमीच्या मैदानावर स्लम सॉकर नागपूरतर्फे मूकबधिर युवकांसाठी सिक्स-ए-साईड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील ६० हून अधिक मूकबधिर पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला. अंतिम फेरीत कोल्हापूर संघाने मुंबई संघाचा १-० असा पराभव करत विजेतेपद पटकावले. कोल्हापूरकडून निर्णायक गोल रितेश शेलके याने केला. सामना संपल्यानंतर प्रमुख अतिथी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रणजीत कुरे यांच्या हस्ते विजेत्या कोल्हापूर संघाला विजयी चषक प्रदान करण्यात आला, तर उपविजेता मुंबई संघालाही आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, मूकबधिर विद्यालय (हुडकेश्वर) चे प्राचार्य राजेश कांडेकर, स्लम सॉकरचे सीईओ डॉ. अभिजीत बारसे आणि क्रीडा विकास संस्थेच्या एचआर महिमा बारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी सहभागी खेळाडूंच्या कौशल्याचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले. या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट मूकबधिर युवकांमधील फुटबॉल कौशल्य शोधणे आणि त्यांच्यात टीम भावना विकसित करणे हे होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजर शिवानी चौधरी, शिबा मार्कस, देवांग छाया, पंच बादल, ईशा, सजल, दर्शन, विक्की आणि श्वेता मूनमून यांनी विशेष मेहनत घेतली. सहभागी खेळाडूंनी उत्कृष्ट आयोजन आणि संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.