spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सिहोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना तुरकर यांचे पुनरागमन; मंत्रालयातून अपात्रतेचा ‘तो’ आदेश रद्द

– ग्रामविकास मंत्र्यांचा मोठा निकाल; राजकीय विरोधकांना बसला चपराक

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- तुमसर तालुक्यातील सिहोरा ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी सिहोराच्या सरपंच रंजना दिनेश तुरकर यांच्यावरील अपात्रतेचा आदेश रद्द केला असून, त्यांना पुन्हा सरपंच पदावर कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या कायदेशीर लढाईत सरपंचांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सिहोरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सलाम शेख आणि इतर ८ सदस्यांनी सरपंच रंजना तुरकर यांच्या कामकाजावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. यामध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून निविदा प्रक्रिया न राबवता स्कूल बॅग आणि आर.ओ. (RO) मशीनची खरेदी करणे, मासिक सभा न घेणे आणि आर्थिक गैरव्यवहार करणे असे गंभीर आरोप करण्यात आले होते. या तक्रारीची दखल घेत अपर आयुक्त, नागपूर विभाग यांनी १ ऑक्टोबर २०२४ रोजी आदेश पारित करून सरपंचांना अपात्र ठरवले होते. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.

अपर आयुक्तांच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात रंजना तुरकर यांनी ग्रामविकास मंत्र्यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. मंत्रालयातील सुनावणीदरम्यान सरपंचांच्या वतीने सविस्तर युक्तिवाद करण्यात आला. ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे सभा घेऊ शकल्या नव्हत्या, याचा वैद्यकीय पुरावाही सादर करण्यात आला. तसेच खरेदीचा जमा-खर्च ग्रामसभेने सर्वानुमते मंजूर केला असल्याने आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप फेटाळून लावला.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा मांडण्यात आला की, साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया राबवणे आणि सरपंचांना कायदेशीर मार्गदर्शन करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीच्या सचिवाची (ग्रामसेवक) आहे. सचिवाने कर्तव्य पार पाडले नसेल, तर त्यासाठी लोकप्रतिनिधीला जबाबदार धरून पदावरून दूर करणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ना. जयकुमार गोरे यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला. “सरपंच ही महिला लोकप्रतिनिधी असून त्यांना अधिनियमातील तांत्रिक तरतुदींची माहिती देणे आणि नियमानुसार कामकाज करून घेणे ही सचिवाची जबाबदारी आहे. केवळ प्रशासकीय त्रुटींसाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला पदावरून दूर करणे योग्य नाही,” असे मत नोंदवत मंत्र्यांनी अपर आयुक्तांचा अपात्रतेचा आदेश रद्द केला.

या निकालानंतर सिहोरा गावात रंजना तुरकर यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा केला. प्रशासकीय तांत्रिकतेचा आधार घेऊन महिला लोकप्रतिनिधीला अडकवण्याचा विरोधकांचा डाव फसला असून, रंजना तुरकर यांनी आपला सरपंच पदाचा गड पुन्हा एकदा यशस्वीपणे राखला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.