– ५० प्रवासी बचावले
– चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
उमरेड, तालुका प्रतिनिधी :- नागपूरहून उमरेडमार्गे प्रवास करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला चांपानजीक अचानक आग लागल्याची घटना सोमवारी घडली. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही प्रवाशांचे सामान आगीत जळून खाक झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून उमरेडच्या दिशेने खासगी ट्रॅव्हल्स बस प्रवास करीत होती. दरम्यान, चांपानजीक असताना बसला अचानक आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. तसेच प्रवाशांना तत्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे बसमध्ये असलेल्या सुमारे ५० प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर पडता आले. काही क्षणांचा विलंब झाला असता तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.
बसला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पाचगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, उमरेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने प्रयत्न सुरू करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बसमधील काही प्रवाशांचे सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या घटनेत बसचेही मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. आगीच्या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. चालकाच्या सतर्कतेमुळे ५० प्रवाशांना जीवदान मिळाल्याची चर्चा परिसरात होती.






