– निलज फाटा येथे नाकाबंदी दरम्यान कारवाई; दोन आरोपींवर गुन्हे दाखल
हंसराज,प्रतिनिधी भंडारा पवनी :- भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पवनी पोलिसांनी अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत निलज फाटा येथे करण्यात आलेल्या नाकाबंदीत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ९० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई नागपूर जिल्ह्यातील चांपा (ता. उमरेड) येथील आरोपी प्रणाल अंबादास मंडके (२९) याच्यावर करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी, पवनी यांच्या आदेशानुसार निलज फाटा येथे नाकाबंदी सुरू असताना टिप्पर (क्रमांक MH 40 CT 5834) तपासणीसाठी थांबवण्यात आला. आरोपीकडे ३ ब्रास रेतीचा परवाना होता, मात्र प्रत्यक्षात टिप्परमध्ये ६ ब्रास रेती आढळून आली. शासनाची फसवणूक करून अतिरिक्त ३ ब्रास रेतीची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी ४० लाख रुपयांचा टिप्पर आणि ३६ हजार रुपयांची रेती, असा एकूण ४० लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत सुकळी (ता. साकोली) येथील आरोपी वाल्मीक काशीनाथ भेंडारकर (४०) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील टिप्पर (क्रमांक MH 40 BF 4186) मध्ये ४ ब्रास रेतीचा परवाना असताना तब्बल ९ ब्रास रेती भरलेली आढळली. यामध्ये ५ ब्रास अतिरिक्त रेती विनापरवाना चोरून नेली जात होती. पोलिसांनी ५० लाखांचा टिप्पर आणि ५४ हजारांची रेती, असा एकूण ५० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही कारवायांमध्ये आरोपींविरुद्ध पवनी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.
सदरची कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. मेश्राम, पो.शि. देवकते, पो.शि. शहारे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले असून अवैध व्यवसायांवर पोलिसांची नजर राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. पुढील तपास पवनी पोलीस करीत आहेत.




