spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर चिखलीच्या सुपुत्राची उंच भरारी

– स्नेहल पाटील यांची ‘पीएसआय’ पदी निवड

कामठी :- “इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि कष्टाची तयारी असेल, तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते,” हे कामठी तालुक्यातील चिखली येथील स्नेहल विनोद पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून स्नेहल यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चिखली ते खाकी वर्दी: संघर्षाचा प्रवास

स्नेहल यांचा प्राथमिक शिक्षणापासूनचा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. चिखली सारख्या लहान गावातून वडोदापर्यंत ७ किलोमीटरचा कच्चा रस्ता पार करत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पावसाळ्यात सायकलच्या टायरला माती चिकटून सायकल चालवणे कठीण व्हायचे, पाठीवर पुस्तकांचे ओझे आणि अंगावर पाऊस अशा स्थितीतही त्यांनी हार मानली नाही.

वडिलांचे स्वप्न आणि प्रशासकीय सेवेचे ध्येय

स्नेहल यांचे वडील माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद पाटील हे स्वतः शेतकरी असून समाजकारणात सक्रिय आहेत. आपल्या मुलाने प्रशासनात जाऊन जनतेची सेवा करावी, अशी त्यांची इच्छा होती. वडिलांच्या याच शब्दांनी प्रेरित होऊन स्नेहल यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. विशेष म्हणजे, कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासशिवाय त्यांनी पुण्याला जाऊन स्वतःच्या कष्टाने हे यश मिळवले आहे. त्यांच्या कुटुंबात भाऊ इंजिनिअर तर बहीण एमबीए असून सर्वांचे शिक्षण मराठी शाळेतूनच झाले आहे. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय  गुरुजनांना दिले आहे.

Popular Articles