spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तिरोडी-बालाघाट रेल्वे मार्गावर मालगाडीच्या धडकेत वाघाचा मृत्यू

तुमसर (भंडारा) :- जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत तिरोडी ते बालाघाट दरम्यान १५ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास मालगाडीच्या धडकेत एका वाघाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गोबरवाही-कटंगी दरम्यान १८ किलोमीटरचा वनपट्टा धोकादायक:तुमसर-कटंगी-बालाघाट रेल्वे मार्गावरील गोबरवाही ते कटंगी दरम्यान सुमारे १८ किलोमीटरचा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. या परिसरात वाघांसह हरिण, नीलगाय, रानडुक्कर, मोर व अन्य वन्यजीवांचा वावर असतो. नैसर्गिक अधिवासातून मार्गक्रमण करताना वन्यजीवांना रेल्वे रुळ ओलांडावे लागतात. अशावेळी वेगाने धावणाऱ्या मालगाड्या त्यांच्या जीवावर बेतत आहेत.

सतर्कतेच्या सूचना देण्याची गरज

वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी गोबरवाही-कटंगी या संवेदनशील रेल्वे मार्गावर रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा ताशी ४० किलोमीटर करण्याची मागणी पुढे येत आहे. रेल्वे आणि वन विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून वन्यजीवांचा वावर असलेली ठिकाणे निश्चित करावीत. या भागात वन्यजीव सावधानतेचे फलक, विशेष सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच लोको पायलटांना सतर्कतेच्या सूचना देण्याची गरज आहे.

वन्यजीव संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी १५ नोव्हेंबर २०२५ रोजी गोबरवाही ते डोंगरी बुजुर्ग रेल्वे स्थानकादरम्यानही एक वाघ रेल्वेच्या धडकेत जखमी झाला होता. एकाच तारखेला दोन वर्षांच्या अंतराने घडलेल्या या घटनांमुळे रेल्वे प्रशासन आणि वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनांकडे केवळ अपघात म्हणून न पाहता प्रशासनाने गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली वन्यजीवांचा बळी जाणे योग्य नाही.

Popular Articles