नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन यांनी सामान्य प्रशासन आणि विधी विभागाचा संयुक्त आढावा घेतला. आयुक्तांनी मनपा मध्ये रिक्त असलेल्या पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू करणे तसेच प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांसाठी शासनाच्या स्तरावर पाठपुरावा सुरू करण्याचे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिले.
मनपातील आयुक्त सभाकक्षात पार पडलेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, वैष्णवी बी, मुख्य अभियंता मनोज तालेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मिलिंद मेश्राम, डॉ. रंजना लाडे, राजेश भगत, गणेश राठोड, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, डॉ श्वेता बॅनर्जी, विधी अधिकारी सुरज पारोचे व इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपायुक्त निर्भय जैन यांनी नवीन आकृतिबंधानुसार विभागांची रचना आणि समायोजित विभागाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मनपाच्या वर्ग एक ते चार पर्यंत एकूण २०५ संवर्ग असून, यात एकूण मंजूर पदे १७,९८१ आहेत. सध्या ९३२२ कार्यरत पदे असून, ८६५९ पदे रिक्त आहे. मनपाला साधारणतः १९ अधिकारी प्रतिनियुक्ती वर शासनाकडून हवे आहे. तसेच सरळ सेवेतून गट अ , ब आणि ड मध्ये भरती करायची आहे. आयुक्तांनी राज्य स्तरावर प्रलंबित असलेल्या भरती आणि प्रतिनियुक्ती बद्दल प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचेही आदेशित केले. तर विधी अधिकारी सुरज पारोचे यांनी विधी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामाची तपशीलवार माहिती दिली. त्यांनी विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती दिली.








