हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- शासनाने हरभरा पिकासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र या योजनेत भंडारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली असून, या प्रश्नी भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भंडारा जिल्ह्याचा हमीभाव खरेदी प्रक्रियेत तातडीने समावेश करावा, या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शासनाने हरभरा खरेदीसाठी जारी केलेल्या अधिकृत पत्रात भंडारा जिल्ह्याचे नाव नसल्याचे समोर आले आहे. भंडारा जिल्हा हा प्रामुख्याने धान उत्पादक म्हणून ओळखला जात असला, तरी गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात हरभरा पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या पिकावर अवलंबून आहे. मात्र, शासनाच्या खरेदी केंद्रांवर जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आशु गोंडाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना मागणी केली की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नाफेड (NAFED) मार्फत हरभरा खरेदी प्रक्रिया तात्काळ राबवण्यात यावी. तसेच जिल्ह्याच्या विविध भागांत आवश्यकतेनुसार खरेदी केंद्रे सुरू करून संबंधित यंत्रणेला कामाला लावण्याचे निर्देश द्यावेत.
हंगामाच्या सुरुवातीलाच हमीभाव खरेदीतून जिल्ह्याला वगळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यापक पावले उचलावी लागतील, असा सूर या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता शासन आणि जिल्हा प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



