– ३ एप्रिलला आनंदधाम रामटेक येथे होणार भव्य विवाह सोहळा
– गरीब कुटुंबातील २२ जोडप्यांचा सामूहिक विवाह
सचिन चौरसिया, रामटेक :- परमात्मा एक मानवधर्म संस्थापक, महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या १०५ व्या जयंती पर्वावर व्यसनमुक्ती अभियान अंतर्गत परमात्मा एक आनंदधाम, रामटेक येथे सतराव्या वर्षीचा सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रम ३ एप्रिल २०२६ शुक्रवारला आयोजित केला आहे. लक्ष्मण मेहर (बाबू) महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत व ब्रँड अँबेसिडर रामटेक आणि परमात्मा एक आनंदधाम चे राष्ट्रीय अध्यक्ष बजरंग मेहर यांच्या मार्गदर्शनात थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात २२ जोडपे विवाहबद्ध होणार असुन मानव धर्माचे संस्थापक, (परमात्मा एक) महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०५ व्या जयंती निमित्त आयोजित सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमाला राज्यमंत्री आशीष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, उदयसिंग यादव नागपूर जिल्हा भाजपा महामंत्री, राकापा चे प्रदेश उपाध्यक्ष तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सामूहिक सोहळ्यामध्ये विवाहबद्ध होणाऱ्या सर्व वधू वरास आशीर्वाद देण्यासाठी सेवक, सेविकांनी आणि बालगोपाळांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लक्ष्मण (बाबूजी) मेहर तथा परमात्मा एक आनंद धाम चे राष्ट्रीय अध्यक्ष बजरंग मेहर यांनी केले आहे.



