– रोजगार-स्वयंरोजगार कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न
कामठी :- ॲड. दादासाहेब कुंभारे यांच्या १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था आणि समाजकार्य महाविद्यालय, कामठी या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय रोजगार – स्वयंरोजगार कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे नेते अजय कदम होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. व्ही. आर. सिरसाठ, संचालक, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास कार्यालय नागपूर, उद्घाटक प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी, हिमांशू गुरुबेले, अधिकारी, खादी ग्रामोद्योग, नागपूर, मधुकर भुरले, साहाय्यक संचालक, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास कार्यालय नागपूर, उषा काळे , गौरव वाघमारे, उद्योग निरीक्षक,जिल्हा उद्योग केंद्र नागपूर, सुकेशनी मुरारकर, रेखा भावे, नगरसेवक आकाश भोकरे, कार्यशाळा समन्वयक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम प्रा. सागर भावे मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर ॲड. दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रा. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या बिडी मजूर चळवळ, आंबेडकरी व रिपब्लिकन चळवळीतील महान कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या जयंतीनिमित्त रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हीच दादासाहेबांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. व्ही. आर. सिरसाठ म्हणाले, वर्तमान काळात तरुणांनी फार काळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःच्या व्यवसायाकडे वळले पाहिजे. व्यवसायाच्या माध्यमातून आपण पुढील पिढीसाठी उपजीविकेची उत्तम व्यवस्था करून ठेवू शकतो. असे सांगून विद्यार्थ्यांना रोजगार स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले व शासनाचे विविध योजनांची माहिती दिली. डॉ. रुबीना अन्सारी यांनी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारा साठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले तर हिमांशू गुरुभेले, उषा काळे, गौरव वाघमारे यांनी राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना रोजगार उभारण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व भांडवल कसे उपलब्ध होते, याविषयी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व माहितीपत्रके वितरित करून विद्यार्थ्यांना रोजगारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ. राहुल जुनगरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. सागर भावे, अखिलेश मेश्राम, हर्षल कुंभारे, मोहम्मद रेहान, संदीप शेरकर, सुशील तायडे, बसंत तांबडे, नीरज वालदे, शशील बोरकर यांनी परिश्रम घेतले.



