“नुसता पंचनामा नको, बिबट्याला जेरबंद करा!” कुरमुडा येथे बकरीच्या शिकारीनंतर ग्रामस्थांचा वनविभागाला इशारा

0
45

हंसराज,प्रतिनिधी भंडारा कुरमुडा :- तुमसर तालुक्यातील कुरमुडा येथे बिबट्याने थेट गावात शिरून बकरीची शिकार केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून, “वन विभागाने केवळ पंचनामा करून आपले कर्तव्य बजावू नये, तर त्या नरभक्षक होणाऱ्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे,” अशी संतप्त मागणी कुरमुडावासीयांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरमुडा येथील विष्णू बाबुराव गाते यांच्या गोठ्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. संपूर्ण गाव गाढ झोपेत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक गोठ्यात हल्ला चढवला. बिबट्याने बकरीचा गळा चिरून तिला जागीच ठार केले. प्राण्यांचा आवाज आणि आरडाओरड झाल्याने गाते कुटुंब व परिसरातील नागरिक जागे झाले, परंतु तोपर्यंत बिबट्याने बकरीचा फडशा पाडला होता.

डोंगरी बुजरुक, कुरमुडा आणि पवनार खारी हा परिसर दाट जंगलाने वेढलेला आहे. काही दिवसांपूर्वीच चिखला आणि चुलरडोह येथे वाघाने गायीची शिकार केली होती. आता बिबट्याने थेट लोकवस्तीत शिरून शिकार केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. “आज बकरी गेली, उद्या माणूस जाईल,” असा जळजळीत टोला लगावत ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वन विभागाने केवळ कागदोपत्री पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे सोपस्कार पार पाडू नयेत. नागरिकांच्या जिवाचे रक्षण करणे ही वनविभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे या परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी कुरमुडा परिसरातील नागरिकांनी केली आहे. वनसंपदेच्या रक्षणासोबतच मानवी जीव वाचवण्यासाठी प्रशासनाने आता ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे.