हंसराज भंडारा, प्रतिनिधी तुमसर :- जिल्हा प्रशासनाने भंडारा, गोंदिया आणि नागपूर या तीन जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचे आदेश दिलेले असतानाही, आदेशाचा भंग करून आपल्या गावात वावरणाऱ्या एका सराईत इसमाला स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहात पकडले. विनोद नंदलाल हांडके (वय ३६, रा. वार्ड क्र. १, सोंड्या, ता. तुमसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद हांडके याच्याविरुद्ध असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे उपविभागीय दंडाधिकारी, तुमसर यांनी ३ नोव्हेंबर २०२५ रोजी (आदेश क्रमांक ८४४/२०२५) अन्वये त्याला भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातून दि. ०३/११/२०२५ ते ०२/०४/२०२६ या कालावधीसाठी हद्दपार केले होते. असे असतानाही, आरोपी विनोद हांडके हा २२ मार्च २०२६ रोजी रात्री १२:२० च्या सुमारास मौजा सोंड्या येथे हजर असल्याचे पोलिसांना आढळून आले.
स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बाबाराव पाटील (वय ४४ वर्षे) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून, सिहोरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे (अपराध क्र. १४२/२०२६).
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सिहोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कळपते (बक्कल नं. ५३२) करीत आहेत. जिल्ह्याच्या सीमा ओलांडून परत येणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची बारीक लक्ष असून, अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.



