Friday, March 27, 2026
spot_imgspot_img
spot_img

नागपुरात पुन्हा रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीचा थरार

– २०२३ नंतर भिडणार दोन्ही संघ

नागपूर :- नागपूरकर क्रिकेटप्रेमींसाठी पुन्हा एकदा मोठी मेजवानी सजणार आहे. ९ ते ११ फेब्रुवारी २०२३ रोजी भारताने ऑस्ट्रेलियावर डाव आणि १३२ धावांनी मिळवलेल्या दमदार विजयाची आठवण अजून ताजी असतानाच, आता पुन्हा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला सामना २१ ते २५ जानेवारी २०२७ दरम्यान विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, जामठा येथे खेळवला जाणार आहे. त्यामुळे नागपूरमध्ये पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटचा जल्लोष रंगणार आहे.

सप्टेंबरपासून क्रिकेटचा महापूर

भारताचा २०२६-२७ हंगाम सप्टेंबरपासून सुरू होणार असून, पहिल्यांदा वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत ३ एकदिवसीय सामने आणि ५ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. त्रिवेंद्रम, गुवाहाटी, चंदीगड, लखनौ, रांची, इंदूर, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांमध्ये सामने रंगणार आहेत. यानंतर डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने होणार आहेत. दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, राजकोट, कटक आणि पुणे येथे हे सामने खेळवले जातील. २०२७ च्या सुरुवातीला झिम्बाब्वेविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार असून, कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई येथे सामने रंगतील.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेचे वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ५ कसोटी सामन्यांची मालिका हा या संपूर्ण हंगामाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे. नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना झाल्यानंतर दुसरा सामना चेन्नई, तिसरा गुवाहाटी, चौथा रांची आणि पाचवा अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. ही मालिका बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअंतर्गत होण्याची शक्यता असून, दोन्ही संघांमधील प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे. या वेळापत्रकामुळे देशभरातील क्रिकेटप्रेमींना आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अशा विविध शहरांमध्ये सामने होणार असल्याने क्रिकेटचा उत्सव देशभर पसरलेला दिसेल.विशेष म्हणजे, नागपूरसारख्या शहरात कसोटी सामना होणे ही स्थानिक चाहत्यांसाठी मोठी संधी मानली जाते.

नागपूर पुन्हा केंद्रस्थानी

२०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या भव्य विजयामुळे नागपूरने आपली ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली होती. आता २०२७ मध्ये पुन्हा त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सामना होत असल्याने उत्सुकता अधिक वाढली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा केवळ सामना नसून, शहरात रंगणारा एक मोठा क्रीडा उत्सव ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष २१ जानेवारी २०२७ कडे लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com