नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी-सुविधा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. शिक्षण विशेष समितीच्या सभापती संतोषदेवी दीपक लठ्ठा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत, आगामी २०२६-२७ शैक्षणिक सत्रात रिक्त पदांवर इंग्रजी शिक्षकांची भरती करण्याचा आणि जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेमी-इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीत शाळांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिस्तीसाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक मशीन तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
गणवेश व साहित्याची तपासणी: विद्यार्थ्यांना दिले जाणारे युनिफॉर्म, शूज आणि सॉक्स यांचा दर्जा तपासूनच खरेदी केली जाईल.
व्याकरण पुस्तकांचे वाटप: इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना व्याकरणाची (Grammar) पुस्तके उपलब्ध करून दिली जातील.
पटनोंदणी मोहीम: शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी पालकांची माहिती व मोबाईल क्रमांकासह विशेष नोंदणी रजिस्टर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या बैठकीला उपसभापती भारती विकास बुंदे, सदस्य विनय विवेक दाणी, वैशाली विलास उदापूरकर, अंकित खुनंदन चौधरी, कांचन सतीश चव्हाण, वर्षा बंडू डोंगरे यांच्यासह उपायुक्त (शिक्षण) डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी माधुरी काटकर, उपशिक्षणाधिकारी सिमा खोब्रागडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.








