महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ

0
32

– ‘माविम’च्या झळाळत्या वाटचालीचा वेध

महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण अंगीकृत उपक्रम असलेल्या ‘महिला आर्थिक विकास महामंडळा’ने (माविम) गेल्या पाच दशकांपासून राज्यातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक सक्षमीकरणाचा पाया भक्कम केला आहे. 24 फेब्रुवारी 1975 रोजी स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्याची व्याप्ती आणि महत्त्व लक्षात घेऊन 20 जानेवारी 2003 रोजी राज्य सरकारने माविमला महिला विकासाची राज्यस्तरीय ‘शिखर संस्था’ म्हणून घोषित केले. आज ‘माविम’ केवळ एक संस्था नसून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध महिला सक्षमीकरण योजनांची अंमलबजावणी करणारी एक प्रभावी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे.

‘माविम’च्या कार्याचा विस्तार आज महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये पोहोचला असून, त्यात मुंबई उपनगरासह २५९ नागरी स्थानिक संस्था आणि 10 हजार 495 गावांचा समावेश आहे. या महामंडळाने तब्बल 20.74 लक्ष महिलांना 1 लाख 68 हजार 361 स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून संघटित केले आहे. विशेष म्हणजे, या बचत गटांनी बँकांकडून 6 अजार 539 कोटी रुपयांचे कर्ज मिळवले असून, त्याचा परतफेडीचा दर 99.5 टक्के इतका कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना रोजगाराच्या संधींशी जोडून देणे ही महामंडळाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. केवळ आर्थिक मदत न करता, महिलांच्या क्षमता विकसित करणे आणि त्यांना शिक्षण, संपत्ती व सत्तेत सहभागी करून घेणे यावर माविमचा विशेष भर आहे.

संस्था बांधणी आणि बळकटीकरण हे माविमच्या कार्यप्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. बचत गट (SELF HELP GROUP), ग्राम संस्था (VILAGE ORGANISATION) आणि 361 समुदाय व्यवस्थापित संसाधन केंद्रांच्या (COMMUNITY MANAGE RESOURCE CENTRE) माध्यमातून तळागाळातील महिलांना सक्षम केले जात आहे. यापैकी 79 टक्के लोकसंस्था (CMRC) आज स्वबळावर कार्यरत आहेत, हे या मोहिमेचे मोठे यश मानले जाते. आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक समतेसाठी लिंग समानता, कायदेशीर जागरूकता, आरोग्य आणि राजकीय निर्णय प्रक्रियेतील सहभाग अशा विविध विषयांवरही काम केले जाते. महिलांच्या उपजीविकेसाठी प्रगत तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणे यामुळे आज 8.70 लक्ष महिला यशस्वीपणे उद्योग व व्यवसायात गुंतल्या आहेत.

माविमच्या छत्राखाली अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले जात आहेत त्यात नवतेजस्विनी: महाराष्ट्र ग्रामीण महिला उपक्रम विकास प्रकल्प., NULM आणि MSRLM: नागरी आणि ग्रामीण उपजीविका अभियानांची प्रभावी अंमलबजावणी., वॉश (WASH): पाणी, स्वच्छता आणि आरोग्याविषयीचे उपक्रम., स्पार्क (SPARK): अपंगत्व समावेशी ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आहेत.

‘नवतेजस्विनी’, ‘अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम’, ‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ आणि ‘वॉश’ (पाणी व स्वच्छता) यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे महिलांच्या उत्पन्नात 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. माविमच्या या गौरवशाली प्रवासाची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली असून, संस्थेला ‘स्कोच गोल्ड अवॉर्ड’, ‘फिक्की स्वच्छता पुरस्कार’ आणि नाबार्डतर्फे ‘सर्वोत्तम फेडरेशन’ असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. महिलांना केवळ कर्जदार न ठेवता त्यांना मालमत्तेचे मालक बनवणे आणि पंचायत राज संस्थांमध्ये त्यांचे स्थान निर्माण करून देणे, यातून ‘माविम’ खऱ्या अर्थाने महिलांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करत आहे. ‘माविम’ हे केवळ एक महामंडळ नसून ते महाराष्ट्रातील महिलांच्या सन्मानाचे, स्वावलंबनाचे आणि प्रगतीचे एक सशक्त प्रतीक बनले आहे.