नागपूर :- महाराष्ट्रातील वीज व्यवस्थेचा कणा असलेल्या तांत्रिक कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी “नवी दिशा – नवा विचार” या संकल्पनेतून तांत्रिक कामगार युनियनकडून राज्यव्यापी जनजागृती आंदोलनाची घोषणा करण्यात येत असल्याची माहिती तांत्रिक कामगार युनियन चे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. राज्यातील तांत्रिक कामगार -विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक तसेच इतर तांत्रिक कर्मचारी – हे ऊन, पाऊस, वादळ अशा कोणत्याही परिस्थितीत अखंडपणे सेवा देत असूनही आजही अनेक मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात येत आहे.
या जनआंदोलनाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
• वर्ग 4 मधील तांत्रिक कामगारांना वर्ग 3 मधील यंत्रचालक पदावर संधी देण्यात यावी.
• विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक यांचा 3 वर्षांचा कंत्राटी कालावधी तात्काळ रद्द करण्यात यावा.
• विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक व वीज सेवक यांचा कंत्राटी कालावधी विविध सेवा लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा.
• 1 एप्रिल 2019 नंतर सुरू झालेल्या सर्व उपकेंद्रांना तात्काळ एमपीआर मंजूर करण्यात यावा.
ह्या केवळ मागण्या नसून तांत्रिक कामगारांच्या सन्मान, अस्तित्व आणि भविष्याशी निगडित प्रश्न आहेत. त्यामुळे या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी युनियनतर्फे करण्यात येत आहे.
तांत्रिक कामगार युनियन महाराष्ट्रातील सर्व झोन, मंडळ आणि विभागांमध्ये हे जनजागृती आंदोलन व्यापक स्वरूपात राबविणार असून सर्व तांत्रिक कामगारांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, कार्याध्यक्ष शिवाजी शिवनेचारी, उपाध्यक्ष बी आर पवार, गोपाल गाडगे, सतीश भुजबळ, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस आनंद जगताप, विलास डवर, विलास निमसटकर, केंद्रीय संघटक महेश हिवराळे, आर आर ठाकूर, अरुण यावले, मनोज मोरे, श्रीराम वाकचौरे, राज्य सचिव रघुनाथ तात्या लाड, प्रकाश निकम, संजय उगले, बाळासाहेब काटे, कोषाध्यक्ष गजानन अघम, नितीन चव्हाण, दत्तू भोईर, प्रसिद्धी प्रमुख अनिल सरोदे, महिला प्रतिनिधी शुभांगी मुचडे, विवेक बोरकर, किरण करहाळे, प्रकाश वाघ, विक्की कावळे, प्रदीप पाटील, युवा तांत्रिक कामगार संसद मुख्य समन्वयक देवेंद्र साळुंके, महिला विंग प्रमुख नीता काबरा, सचिव मनीषा औंदे यांनी केली आहे.



