हंसराज, भंडारा लाखनी :- लाखनी पोलिसांनी अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात धडक मोहीम राबवत एका बाराचाकी टिप्परसह ३० लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस स्टेशन लाखनी अंतर्गत पोलीस हवालदार वडेटवार हे आपल्या पथकासह परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना गोपनीय बातमीदाराकडून मौजा खुटसावरी रोडवर अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने खुटसावरी रोडवर सापळा रचून धाड टाकली असता, टाटा कंपनीचा बाराचाकी टिप्पर (क्रमांक MH 49 BZ 5375) विनापरवाना रेतीची वाहतूक करताना रंगेहात पकडण्यात आला.
या कारवाईत पोलिसांनी ३० लाख रुपये किमतीचा बाराचाकी टिप्पर आणि त्यामध्ये असलेली ५४ हजार रुपये किमतीची अंदाजे ९ ब्रास रेती, असा एकूण ३० लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी आशिष श्रीकृष्ण बांडेबुचे (३७), रतिराम बकाराम राखडे (४०) आणि टिप्पर मालक संदीप मनोहर बांते (४५), तिघेही राहणार भिलेवाडा, जि. भंडारा यांच्याविरुद्ध संगनमताने शासकीय रेतीची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखनी पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध अपराध क्र. १८३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ई ), ४९, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सदर यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वडेटवार व लाखनी पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, पुढील तपास लाखनी पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.