– विर्शी येथील घटना; पहाटे नैसर्गिक विधीसाठी गेली असता बिबट्याने केला मानेवर हल्ला
हंसराज, भंडारा साकोली :- साकोली वनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या विर्शी परिसरात आज पहाटेच्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारी एक घटना घडली. एका नरभक्षक बिबट्याने पाच वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला करून तिला जागीच ठार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
अंशिका काशीनाथ मिरी (वय ५ वर्ष) असे मृत मुलीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील सुहेला (जिल्हा बलोदाबाजार) येथील रहिवासी असलेले काशीनाथ मिरी हे आपल्या कुटुंबासह साकोली तालुक्यातील विर्शी येथील संजय कापगते यांच्या शेतात विटाभट्टीच्या कामासाठी आले असून तिथेच झोपडी टाकून वास्तव्यास आहेत.
बुधवार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास अंशिका ही झोपडीबाहेर नैसर्गिक विधीसाठी (बाथरूमला) गेली होती. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. बिबट्याने थेट तिच्या मानेचा घोट घेतल्याने गंभीर जखमी होऊन अंशिकाचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
विर्शी आणि साकोली परिसरात बिबट्याचा वावर गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. यापूर्वीही बिबट्याने अनेक हल्ले केले असून, या ताज्या घटनेमुळे विटाभट्टी कामगार आणि स्थानिक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. आपल्या पोट भरण्यासाठी परराज्यातून आलेल्या कामगार कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा आणि पीडित कुटुंबाला वनविभागाकडून तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.