-विद्यार्थिनींनी सादर केली भीमगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम; महामानवाच्या विचारांना उजाळा
नागपूर :- येथील आधार-शिला मुलींच्या हॉस्टेलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना बाबासाहेबांच्या महान विचारांची प्रेरणा देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि सामूहिक अभिवादनाने करण्यात आली. यावेळी हॉस्टेलमधील विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवत भीमगीते सादर केली. तसेच, भीमगीतांच्या तालावर अतिशय सुंदर नृत्य (डान्स) सादर करून उपस्थितांची मने जिंकली. केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे, तर अनेक मुलींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर, त्यांच्या संघर्षावर आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानावर अभ्यासपूर्ण भाषणे दिली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे. त्यामुळे मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःची प्रगती करावी आणि बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा. या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास वाढीस लागल्याचे दिसून आले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. प्रज्ञा मेश्राम, डॉ. युवराज मेश्राम आणि हॉस्टेल वार्डन श्रद्धा सचिन मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.