– पहिल्या टप्प्यात १५०० घरांना मिळणार जोडणी; ‘अदानी टोटल गॅस’चे काम युद्धपातळीवर
हंसराज, भंडारा :- वाढत्या महागाईच्या काळात भंडारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात लवकरच पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) सेवा सुरू होणार असून, यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती गॅसवरील खर्चात २० ते २५ टक्क्यांची कपात होणार आहे. सध्याच्या एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत पीएनजी अधिक स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर असल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.
काय आहेत पीएनजीचे फायदे?
🔹 खर्चात मोठी बचत: एलपीजी सिलिंडरच्या सध्याच्या
दरांच्या तुलनेत पीएनजी वापरल्यास महिन्याला सुमारे २०० ते २५० रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
🔹 ग्राहकांना जितका गॅस वापरला जाईल, तितकेच पैसे द्यावे लागतील. यासाठी घरात गॅस मीटर बसवले जाणार असून वापराप्रमाणे दरमहा देयके (Bills) येतील.
🔹 गॅस संपण्याची भीती किंवा सिलिंडर बुकिंगसाठी वाट पाहण्याची आता गरज उरणार नाही. पाईपलाईनद्वारे २४ तास अखंडित गॅस पुरवठा सुरू राहील.
डिपॉझिटची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सोय नव्या पीएनजी कनेक्शनसाठी नोंदणी करताना ग्राहकांना सुरुवातीला केवळ १३०० रुपये (अनामत रक्कम) जमा करावे लागतील. उर्वरित ५००० रुपयांची रक्कम ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार २० बिलिंग सायकलमध्ये (हप्त्यांमध्ये) भरता येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांवरील आर्थिक भार कमी होणार आहे.
जिल्ह्यातील कामाची सद्यस्थिती भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील ‘तुडका’ येथे ‘अदानी टोटल गॅस लि.’ या कंपनीच्या डेपोचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मोहाडी मार्गे वरठी पर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याची माहिती कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक बजरंग राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. गॅसचा दाब नियंत्रित करण्यासाठी ‘डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशन’ (DRS) उभारण्यात येत आहेत, ज्यामुळे घराघरांत अत्यंत सुरक्षित पद्धतीने गॅस पुरवठा केला जाईल.
प्रशासनाचे आवाहन एलपीजीला पर्याय म्हणून पीएनजी गॅस ही काळाची गरज आहे. ही सेवा केवळ स्वस्तच नाही, तर पर्यावरणापूरक आणि अत्यंत सुरक्षित आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १००० ते १५०० कुटुंबांना याचा लाभ मिळेल. ज्या भागात पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे, तिथे नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भंडारा आणि जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी केले आहे.

