Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लाखनी तालुक्याच्या विकासकामांचा घेतला आढावा; मातोश्री पांदण रस्त्यांची केली पाहणी

– पालांदूर येथे जिल्हाधिकाऱ्यांचा ‘जनता दरबार’; समस्यांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

हंसराज, लाखनी/पालांदूर :- लाखनी तालुक्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासोबतच पालांदूर येथे ‘जनता दरबार’ भरवून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व त्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाला खडे बोल सुनावले.

जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज सकाळी लाखनी तालुक्यातील ‘मातोश्री पांदण रस्ते’ योजनेची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी हे रस्ते किती महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी नूतन ग्राम महसूल कार्यालय व ग्राम सचिवालयास भेट दिली. कार्यालयातील कामकाजाची पद्धत, दप्तर तपासणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा आढावा घेऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

जनता दरबारात समस्यांचा पाऊस दौऱ्याचा मुख्य टप्पा पालांदूर येथील भव्य ‘जनता दरबार’ होता. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दरबारात उपजिल्हाधिकारी प्रशांत पडघन, उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांच्यासह विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. या दरबारात पालांदूर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी गावच्या समस्या मांडल्या. रस्ते, पाणी, महसूल आणि शेतीविषयक तक्रारींचा यात समावेश होता.

अधिकाऱ्यांना दिले तत्काळ आदेश नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. “सामान्य नागरिकांना कामासाठी चकरा मारायला लावू नका, लोकांची कामे वेळेत पूर्ण करा,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.