– उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
नागपूर :- वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यंदा उन्हाळ्यात तापमान विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, उष्माघात व इतर उष्णता जन्य आजारांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी समस्त नागरिकांना केले आहे.
महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या देखरेखीत उष्माघात प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी दुपारच्या वेळेत (१२ ते ४) शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, छत्री किंवा कापडाचा वापर करावा. भरपूर पाणी पिणे, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, उलट्या होणे, डोकेदुखी, ताप येणे आदी आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी नियमित अंतराने पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उष्माघात हा एक घातक आजार असून याकरिता उपचार करण्याकरिता शहरातील शासकीय आरोग्य संस्थेमध्ये ११ ठिकाणी “कोल्ड वॉर्ड” (Cold Ward) ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, शहरातील भटके व बेघर व्यक्तींना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मागील एक आठवड्यात ५० व्यक्तींना बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असून बेघर निवारा केंद्रात एकूण ४३२ व्यक्तींची सोय करण्यात आली आहे. अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांची वेळ सकाळी ७ ते १०:३० पर्यंत करण्यात आली आहे. हातगाडी विक्रेते, बेघर व प्रवासी नागरिकांसाठी शहरातील उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची व सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे व उद्याने दुपारच्या वेळेत उघडे राहतील याबाबत व्यवस्था करण्यात आली आहे. आजपर्यंत उष्णतेशी संबंधित आजारांचे (HRI) एकूण ३८ रुग्ण नोंदवले गेले असून, सध्या हीट स्ट्रोकचा एकही रुग्ण आढळलेला नाही व एकही रुग्ण दाखल (admit) नाही असी माहिती नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
सफाई कर्मचाऱ्यांची वेळ बदलून सकाळी ५ ते दुपारी १ अशी करण्यात आली असून ही वेळ १५ जूनपर्यंत लागू राहणार आहे.तसेच, नागपूर महानगरपालिकेच्या Heat Action Plan अंतर्गत नागपूर शहरातील एकूण ३१ ट्रॅफिक सिग्नल दुपारच्या वेळेत ब्लिंकर मोडवर ठेवण्यात येणार आहेत, ज्यामुळे चौकांवरील प्रतीक्षा वेळ कमी होऊन प्रवाशांना उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व आरोग्य केंद्रे, दवाखाने व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक औषधे व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

