मुंबई :- भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे तसेच विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जनतेशी निगडित अनेक महत्त्वाचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यात आले. जिल्ह्यातील रस्ते, सिंचन, वीज, पाणीपुरवठा, कृषी, आरोग्य, शिक्षण तसेच शहरी व ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा यांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून विकासकामांना गती देण्याची मागणी करण्यात आली.
विशेषतः शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने शेतीपंपांना पूर्णपणे १६ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी ठाम मागणी बैठकीत करण्यात आली. सध्या अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न तातडीने सोडविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
तसेच खरीप हंगामातील धान खरेदीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मर्यादा (लिमिट) शिथिल करून शेतकऱ्यांकडील संपूर्ण धान खरेदी करण्यात यावे, अशी मागणीही बैठकीत जोरकसपणे मांडण्यात आली. धान उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर, वेळेवर खरेदी व आर्थिक न्याय मिळावा यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त करण्यात आले.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आ. नाना पटोले, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी आमदार दिलीप बनसोड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

