spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आत्मनिर्भर यवतमाळ घडविण्याचा संकल्प ! – पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे प्रतिपादन

– ६७ वा महाराष्ट‍्र स्थापना दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

 

– पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

– उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

– वन हक्क पट्ट्यांचे वाटप

– ६२ पोलीस वाहनांचे लोकार्पण

यवतमाळ :- मागील काही वर्षांमध्ये झालेल्या विकास कामांमुळे जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात जिल्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येत्या काळात ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ साठी सर्वांनी आत्मनिर्भर यवतमाळ घडविण्याचा संकल्प करुया, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी 1 मे महाराष्ट‍्र दिनी केले.

समता मैदानात महाराष्ट‍्र राज्याचा 67 वा स्थापना दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर भगिनी, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.

राज्यातील थोर महापुरुष , समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करुन पालकमंत्री ना. संजय राठोड पुढे म्हणाले की, यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात विविध योजना राबवित आहोत.

अवकाळी पावसामुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी साडेचार कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. शेतकऱ्यांना ही मदत वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३० हजार शेतकऱ्यांना पंधराशे कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना सुरू

जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्यस्थितीत ४९ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, पाणी टंचाई निवारणार्थ प्रशासनाला नियोजनाचे निर्देश देण्यात आले आहेत आणि त्यानुसार उपाययोजना सुरू आहेत. पशूधनासाठी जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्यात येत आहे.

भूजल पातळी वाढीसाठी ‘जलतारा’

जलयुक्त शिवार योजना २.०, भूजल पातळी वाढवण्यासाठी आपण ‘जलतारा’ संकल्पनेंतर्गत ‘शेत शोषखड्डा’ ही योजना राबवत आहोत. या योजनेअंतर्गत जवळपास 3,500 शेत शोषखड्डे शेतक-यांना करुन देण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांना आर्थिक आधार

शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या माध्यमातून २ लाख ९० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना ११६ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ५१ हजार शेतकऱ्यांना ११ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे.

कर्जमाफीची कार्यवाही गतीने सुरु

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली असून शासनस्तरावर कार्यवाही गतीने सुरु आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरिता जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर प्रकल्पांना गती दिली जात असून जिल्ह्यात सुमारे दिड लाख शेतकऱ्यांपैकी ७० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे.

पारंपरिकसह शेतीपूरक व्यवसायाकडे

मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून २६०० हून अधिक शेतकऱ्यांनी २७०० हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे. शेतकरी आता पारंपरिक शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. तसेच कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकरी शास्त्रज्ञ मंच आणि शिबीरांद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन व प्रशिक्षणही दिले जात आहे.

‘मिशन उभारी’चा आधार

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपण ‘मिशन उभारी’या उपक्रमातून ७०० हून अधिक संकटग्रस्त कुटुंबांना मानसिक आणि आर्थिक आधार दिला आहे.

उद्योगांना चालना

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मागील आर्थिक वर्षात ६५६ कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आले असून नवीन उद्योग उभारण्यास सुरुवात झाली आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत २८२ प्रस्तावांना मंजुरी देऊन २२ कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले असून शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यात आली आहे.

उत्तरवाढोणा येथे रिलायंसचा बायोगॅस प्रकल्प

आत्मनिर्भर भारत संकल्पने अंतर्गत नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथे रिलायंसचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यानेही आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

जलसंधारणाला गती

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत एकूण १३ हजारपेक्षा जास्त कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ९ हजार पेक्षा जास्त कामे पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी आतापर्यंत १२७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण विभागा अंतर्गत ४३ तलावांचे नादुरुस्त कालवे संपूर्ण पाईपलाईन करण्याचे हे धोरण हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी एकूण खर्च २९० कोटी असून प्रकल्पीय सिंचन क्षमता ११ हजार हेक्टर एवढी वाढ होणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागच्या आर्थिक वर्षात ८४ तलावातून सुमारे २० लाख घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. यावर्षी २६६ नाल्यातील १०३ लाख घन मीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे, त्यासाठी ३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

निवासी अतिक्रमणे नियमित होणार

राज्यातील गरीब व गरजू कुटुंबांच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यातील १ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यापूर्वीचे निवासी अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहे.

शेत पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण

ग्रामीण भागातील शेत पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका स्तरावर समित्या नेमण्यात आल्या आहेत.

समाधान शिबिरातून १ लाख ९५ हजार लाभार्थ्यांना लाभ

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत जिल्ह्यात गावोगावी शिबिरांचे आयोजन करुन तब्बल १ लाख ९५ हजार लाभार्थ्यांना शासनाचे विविध लाभ थेट मिळवून देण्यात आले आहे. स्वामित्व योजनेंतर्गत १६३४ गावांमध्ये ३ लाख ६९ हजार धारकांना त्यांच्या घराचे अधिकार अभिलेख उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच महसूल प्रशासनाचे कामकाज गतीने होण्यासाठी यंत्रणेला सुसज्ज वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत.

शहरी व ग्रामीण रुग्णालयांचा विकास

आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागातील रुग्णालयांचा विकास केला जात आहे. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांकरीता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत रुग्णालयांना ४८० कोटी

एकत्रित आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेतील आजारांची वाढ करण्यात आली असून आता २३९९ आजारांवर उपचार घेता येणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील १ लाख रूग्णांनी लाभ घेतला असून त्याकरिता शासनाने एकूण ४८० कोटी रुपये रुग्णालयांना अदा केले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून यवतमाळ जिल्ह्यातील पात्र रुग्णांना सुमारे २ कोटी ३८ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. हा निधी गरजू रूग्णांना ‘आधार’ठरत आहे.

जिल्हा प्रशासनाचे डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल

डिजिटल क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकत जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेत. ‘युवा संवाद’ उपक्रमाद्वारे आपण जिल्ह्यातील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षार्थींना स्पर्धा परीक्षांची तयारी व करिअर मार्गदर्शन करत आहोत. जिल्ह्यातील प्रकल्प, योजनांना गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘जिल्हा वॉर रुम’ सुरु केली आली असून त्याचे प्रभावीपणे काम सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आपला जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे, याचा मला आनंद आहे.

रस्ते विकास व पायाभुत सुविधांसाठी पाच हजार कोटींची कामे सुरु

सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत जिल्ह्यात रस्ते विकास व पायाभुत सुविधांची, पाच हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे सुरु आहेत. त्यापैकी ५१० कामे पूर्ण झाले असून ८०७ कामे प्रगतीपथावर आहेत.

५२ हजार घरकुल पूर्ण करणारा यवतमाळ एकमेव जिल्हा

पंचायत राज संस्था गतिमान करण्यासाठी जिल्ह्यातील १२४१ ग्रामपंचायतींमध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातून ग्रामीण विकासाचा पाया भक्कम करीत आहोत. विविध घरकुल योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात ५२ हजार लाभार्थ्यांची घरकुल भौतिकदृष्ट्या पूर्णत्वास आली आहे. लाभार्थ्यांना साडेचारशे कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. एवढे घरकुल पूर्ण करणारा यवतमाळ राज्यात एकमेव जिल्हा आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.

विद्यार्थ्यांना खाजगी शाळांसारखे दर्जेदार शिक्षण

आधुनिक तंत्रज्ञान आणि AI च्या युगात विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही शिक्षण उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या सुमारे २०० शाळांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. खनिज विकास निधीतून जिल्ह्यात मॅाडेल स्कूल, डिजीटल स्कूल, अभ्यासिका, स्मार्ट क्लासरूमची निर्मिती करुन विद्यार्थ्यांना खाजगी शाळांसारखी दर्जेदार शिक्षण व्यवस्था उपलब्ध केली जात आहे.

पोलीसांसाठी नवीन अत्याधुनिक वाहने व लोहाऱ्यात एक हजार सीसीटीव्ही

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाला जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अत्याधुनिक चारचाकी वाहने उपलब्ध केल्याने कामात अधिक गती आली आहे. बहुतांश तालुक्यात सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्यास मंजुरी देण्यात आली असून ही यंत्रणा कार्यान्वित केल्याने गुन्ह्यांची उकल करण्यास मदत होत आहे. लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी चार कोटी 95 लाख रुपयांचा निधी वितरीत केला असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी धरती आबा, प्रधानमंत्री जनमन योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.

कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तुंचे वाटप

कामगार कल्याण मंडळामार्फत जिल्ह्यातील २ लाख १८ हजारहून अधिक कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच आणि १ लाख १६ हजार कामगारांना गृहोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय, साडेपाच लाखांपेक्षा जास्त कामगारांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे.

नागरिकांना स्व-गणना करण्याचे आवाहन

राज्यात आजपासून भारताच्या 16 व्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या टप्प्यात नागरिकांना आपल्या मोबाईलवरुन डिजिटल स्व-गणना करता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली स्व-गणना पूर्ण करुन या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार

या समारंभात पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते विविध विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपनिरिक्षक गजानन अजमिरे, जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारार्थी वंदना वाघमारे व सुलभा गौड, जिल्हा युवा पुरस्कारार्थी मनिष आडे, पपीता माळवे व लक्ष्य बहुद्देशीय संस्था, ग्रामपंचायती सरपंच तथा सचिव, सहा. कृषी अधिकारी प्रतिक मन्नरवार, जिल्हा नियोजनचे सहायक संशोधन अधिकारी संदिप पवार, मुख्यमंत्री फेलो विठ्ठल गाडगे, आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कारार्थी नितीनचंद्र भडंगे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुसद तालुक्यातील शिवाजीनगर येथील सात लाभार्थ्यांना वन हक्क पट्ट्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी पोलीस व गृहरक्षक दलाच्या पथसंचलनाचे निरीक्षण करुन सलामी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रबोधी घायवाटे आणि शुभांगी वानखेडे यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.