spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गणेशपुरात पोलीस चौकीचे उद्घाटन; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा पुढाकार

हंसराज भंडारा :- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गणेशपूर परिसरात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी, पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या संकल्पनेतून गणेशपूर येथे नवीन पोलीस चौकीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये ही चौकी कार्यान्वित करण्यात आली असून, यामुळे आता गणेशपूर आणि परिसरातील नागरिकांना २४ तास पोलीस संरक्षण उपलब्ध होणार आहे.

गेल्या काही काळापासून गणेशपूर परिसरात अवैध दारू विक्री, तरुणांमध्ये वाढलेले अंमली पदार्थांचे सेवन, चोरी, घरफोडी आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. तसेच गणेशपूर नजीक असलेल्या कोरंभी नॅशनल हायवेवर वाहनचालकांना अडवून लुटण्याचे प्रकारही घडले होते. या पार्श्वभूमीवर, गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच पायबंद घालण्यासाठी येथे पोलीस चौकी असावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती. जनतेची ही मागणी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.

या नवीन पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांदाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या दिमतीला एक पोलीस हवालदार व तीन पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. या चौकीच्या कार्यक्षेत्रात गणेशपूर, बेला, पिंडकेपार आणि कोरंभी या मुख्य गावांचा समावेश असेल. चौकीतील अधिकारी व कर्मचारी नियमितपणे परिसरात गस्त घालून अवैध धंदे, अमली पदार्थ सेवन करणारे आणि सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार आहेत.

१ मे रोजी आयोजित या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे, भंडारा शहर ठाणेदार उल्हास भुसारी, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, गणेशपूरच्या सरपंच सौ. विद्या मेहर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पोलीस चौकीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Popular Articles