spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराजस्व अभियानात 60 हजार विविध दाखले वाटप

 – महाराष्ट्र दिनी उत्तम कार्य करणा-यांचा सत्कार

हंसराज भंडारा :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाव्दारे सामान्य नागरिकांना अनेक सेवा देण्यात येतात ,एकाच छताखाली विविध दाखले व सेवा देण्याचा हा महसूल विभागाचा अभिनव उपक्रम आहे.

जिल्हयातील 60 हजार दाखले ज्यामध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला सातबारा उतारा, फेरफार नोंद, भूमापन , वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, संजय गांधी योजना आदी विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज राज्य स्थापना दिवसाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात सांगितले.

नागरिकांना अनेक सेवा सामान्य नागरिकांच्या दारी पोहोचविण्यासाठी महसूल प्रशासन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराजस्व अभियान हे महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागामार्फत राबवले जाणारे एक महत्त्वाचे अभियान असून याचा मुख्य उद्देश नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे.

जिल्हयाच्या विकासासाठी शासनाचे लक्ष असून या जिल्हयाच्या सर्वागिण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन गृह राज्यमंत्री ग्रामीण योगेश कदम यांनी आज केले.

पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभात ते जिल्हावासीयांना संबोधित करत होते. सकाळी 8 वाजता राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणापुर्वी राष्ट्रीय गीत वंदे मातरमाने कार्यक्रमाला सुरूवात झाली.त्यानंतर राष्ट्रीय सलामी व राष्ट्रगीत व राज्यगीत म्हणण्यात आले.उष्ण तापमानाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षी कार्यक्रमाचे मोजक्या स्वरूपात आयोजन करण्यात आले होते.

मुख्य कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सावन कुमार,मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे,पोलीस अधिक्षक नुरूल हसन,वनसंरक्षक योगेंद्र सिंग उपस्थित होते.

यावेळी भाषण करतांना राज्यमंत्री कदम यांनी राज्य् स्थापना दिवसांच्या शुभेच्छा दिल्या.

1960 साली 106 हुतात्म्यांच्या बलीदानाने महाराष्ट्र राज्य् स्थापन झाले. कामगारांच्या श्रमाच्या बळावर आपल्या देशाची व राज्याची घडी उभी आहे.त्यांच्या सन्मानासाठी आजचा दिवस समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.

भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून खरीप हंगाम पणन 2025-26 मध्ये 90 हजार शेतक-यांकडुन 32 लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली असल्याचे कदम यांनी भाषणात सांगितले.

जिल्हयात कायदा व सुव्यवस्था उत्तम असून गेल्या 10 वर्षातील कमी गुन्हयांची नोंद झाली आहे ,त्याबददल पोलीस प्रशासनाचे त्यांनी कौतुक केले.डिजीटल स्वरूपातील होणारे आर्थीक गुन्हयाप्रती नागरिकांनी सजग असले पाहीजे.अश्या स्वरूपाच्या गुन्हयांसाठी पोलीस प्रशासन नव तंत्रज्ञानाच्या मदतीने गतीने काम करत असल्याचे कदम यांनी सांगितले.

उत्कृष्ट कार्य करणा-या समाजसेविकांचा सन्मान

महिला व बाल विकास विभागाच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज सेविकांचा गौरव करण्यात आला.

सन 2022–23 या वर्षासाठी मंजुळा पांडुरंग बुरडे यांना तसेच सन 2023–24 या वर्षासाठी कल्याणी रमेश तिरपुडे यांना पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कारामध्ये शाल, श्रीफळ, रोख रक्कम व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पोलीस विभागातील उत्कृष्ट कामगीरीसाठी कृष्णकुमार तिवारी, अमरदास धंदर ,विजयकुमार पुंडे आणि गणेश पडवार यांचा समावेश आहे.

या अधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून राज्यमंत्री योगेश कदम यांनी सन्मानित केले.

कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम व जनगणमन या राष्ट्रीय गीतांनी झाली.कार्यक्रमाचे संचलन शिक्षक मुकुंद ठवकर व शिक्षीका मंजुषा लोंदासे यांनी केले.

Popular Articles