Home Latest News वन्यजीव तहानेने व्याकुळ : प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह

वन्यजीव तहानेने व्याकुळ : प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह

0
2

– वनविभागातील कृत्रिम पाणवठे पडले कोरडे

सचिन चौरसिया, रामटेक :- उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना देवलापार वनपरिक्षेत्रातील वन्यजीवांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाने लाखो रुपये खर्चून उभारलेले कृत्रिम पाणवठे सध्या देखभालीअभावी कोरडे पडले असून, पाण्यासाठी वन्यजीवांना भटकंती करावी लागत आहे. या दुर्लक्षामुळे वन्यप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बेलदा ते पिंडकेपार आणि सीतापार मार्गालगतच्या जंगलात माकडांचे कळप कोरड्या पाणवठ्यांभोवती पाण्याच्या आशेने बसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. येथील हातपंप सुरू करून पाणवठे भरण्याची तसदीही वन कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी मानवतेच्या भावनेतून हातपंपाद्वारे पाणी काढून तेव्हा माकडांनी पिल्लांसह पाण्यावर गर्दी केली. विशेष म्हणजे, काही पाणवठे वन चौक्यांपासून हाकेच्या अंतरावर असूनही कोरडे आहेत. यावरून वन विभागाच्या निष्काळजीपणा उघड झाला आहे. वन विभागात मजुरांच्या वेतनासाठी निधीअभावी मनुष्यबळाच्या अभाव असल्याचे सांगितले जात आहे. मात्र केवळ नियोजनाअभावी वन्यजीवांचे हाल होत असल्याच्या आरोप नागरिक करत आहेत. वारंवार उद्भवणारी ही समस्या सोडवण्यासाठी सौरउर्जेवर चालणारे पंप बसवण्याची मागणी होत आहे.

वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण 

माकडांप्रमाणेच वाघ व इतर हिंस्त्र प्राण्यांनाही पाण्याअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीकडे वळण्याचा धोका वाढला आहे. वन्यजीव संवर्धनाचे दावे करणाऱ्या वन विभागाने तातडीने लक्ष देऊन सर्व पाणवठ्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, वन्यजीवांच्या मृत्यूची जबाबदारी प्रशासनावरच येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.