– CEIR पोर्टलचा प्रभावी वापर; ९ मोबाईल मूळ मालकांना केले परत
हंसराज, भंडारा :- तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सतर्कता दाखवत भंडारा जिल्हा पोलीस दलाने नागरिकांचे हरवलेले महागडे मोबाईल शोधून काढण्यात मोठे यश संपादन केले आहे. केंद्र सरकारच्या ‘CEIR’ (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या साहाय्याने शोध घेण्यात आलेले विविध कंपन्यांचे ९ मोबाईल संच करडी पोलिसांनी नुकतेच त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द केले.
काही दिवसांपूर्वी विविध नागरिकांनी आपले मोबाईल हरवल्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, पोलीस प्रशासनाने या मोबाईलची नोंदणी CEIR पोर्टलवर केली होती. करडी पोलिसांनी या पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक शोध घेतला. शोधमोहिमेदरम्यान ट्रेस झालेले
विविध कंपन्यांचे ९ मोबाईल हस्तगत करण्यात आले. हे जप्त केलेले मोबाईल पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या हस्ते संबंधित मोबाईल धारकांना पोलीस स्टेशन भंडारा येथे सन्मानाने परत करण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आणि सायबर पथकाचा मोलाचा वाटा आहे.
पोलीस दलाचे आवाहन: नागरिकांनी आपले मोबाईल हरवल्यास घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी. तसेच www.ceir.gov.in या पोर्टलवर स्वतःहून नोंदणी करावी. जेणेकरून तांत्रिक साहाय्याने त्यांचा शोध घेणे सोपे होईल, असे आवाहन भंडारा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.