मुंबई :- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ४११ गावे आणि ११९४ वाडया अशा १६०५ ठिकाणांवरील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. मे मध्ये ही अवस्था आहे तर जून मध्ये काय होईल याची कल्पना करा. तुमच्या कडे खूप पाणी असले तरी ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांचा विचार करून पाणी जपून वापरा.
उन्हाची काहिली मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिना अखेर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून तो आता ३८ टक्यावर आला आहे.
राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट आहे. पाण्याचा साठा कमी होत असल्याने ग्रामस्थ टँकरवर अवलंबून आहेत. राज्यातील १२ जिल्ह्यातील ४११ गावे आणि ११९४ पाड्यावर टँकरने पाणी पुरवठा होत आहे. यात २० शासकीय टँकर व ४४६ अशा ४६६ टँकरने मे महिन्याच्या पहिल्याच आठवडयात पाणी पुरवठा सुरु झाला आहे. एप्रिल महिन्याच्या चौथ्या आठवड्यात ३२१ टँकर धावत होते. या आठवड्यात टँकरची संख्या एकदम ४६६ वर गेली आहे.
सर्वाधिक १३८ टँकर संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठा करीत आहेत. नाशिकमध्ये ८३ टँकर वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करीत आहेत. ठाणे-३२, रायगड ५०, रत्नागिरी १८, पालघर २८, पुणे ३७ आणि साताऱ्यात ४१ टँकर सध्या पाणी पुरवठा करीत आहेत.राज्याच्या धरणातील पाणीसाठाही झपाट्याने खालावत आहे. सद्यस्थितीत राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाणीसाठी ३७. ३७ टक्क्यांवर आला आहे. राज्यातील वीज निर्मितीची मुख्य भिस्त असलेल्या साता-यातील कोयना धरणातील पाणीसाठा २५. ७२ टक्क्यांवर आहे.