– नवनाथ बन यांची संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका
मुंबई :- पश्चिम बंगालमधील विजयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केल्यावर संजय राऊत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ट्रम्प यांनी सर्वच निवडणुकांमध्ये सर्वात मोठा भोपळा मिळाल्याबद्दल आणि आपले आमदार सांभाळता आले नाहीत याबद्दल संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करायला हवे होते. आपल्या पक्षनेतृत्वाचे काय हाल झाले आहेत याचा विचार करा आणि मग ट्रम्प यांना ट्वीट करून प्रश्न उपस्थित करा. भारताची लोकशाही अखेरचा श्वास घेत नाही तर उबाठा गट अखेरचा श्वास घेत आहे. कारण तुमच्या पक्षाला घरी बसवण्याचे काम जनतेने केले आहे, अशी घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बन म्हणाले की, तामिळनाडूत कुणाला शपथविधीसाठी बोलवायचे याचा निर्णय घेण्यासाठी तेथील राज्यपाल समर्थ आहेत. सर्वात मोठा पक्ष असला की त्याला बहुमतासाठी निश्चितपणे बोलावले जाते. तामिळनाडूत सध्या राजकीय स्थिती बदलत असून वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत. त्यातून जो योग्य बहुमत सिद्ध करू शकेल, त्यालाच निश्चितपणे बोलावले जाईल. लोकभावनेचा आदर करण्याचे काम राज्यपालांच्या वतीने निश्चित केले जाईल. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद गेल्यापासून उद्धव आणि उबाठा गट अस्वस्थ आहेत. तामिळनाडूत उबाठा गटाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, असे वाटत असेल तर संजय राऊत यांनी एक पत्र घेऊन राजभवनात जावे आणि महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला घरी बसवले, किमान तामिळनाडूत तरी आम्हाला शपथविधीला परवानगी द्या, अशी मागणी करावी, अशा शब्दात बन यांनी खिल्ली उडवली.
भगतसिंह कोश्यारी यांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना शपथविधीची संधी दिली होती, तेव्हा सर्वात मोठा भाजपा पक्ष म्हणून बोलावले नव्हते, असे स्पष्ट करून बन म्हणाले, अजितदादांनी आपल्या आमदारांच्या समर्थनाचे पत्र कोश्यारी यांना दिले होते. त्या पत्राच्या आधारावर भाजपा आणि राष्ट्रवादीचे आमदार मिळून 144 च्या आकडा पुढे जात होता म्हणून शपथविधीसाठी बोलवले होते. भाजपाला एकट्याला बोलवले नव्हते. संजय राऊत, तुम्हाला विस्मृतीचा आजार झालाय. आता तुमच्यामध्ये एवढी हिंमत असेल तर तुम्ही उद्धव ठाकरेंचे नाव घेऊन तामिळनाडूमध्ये समर्थनाचे पत्र घेऊन जा. राज्यपाल तुम्हालाही शपथविधीसाठी बोलवतील.
तुमची 25 वर्षे युतीमध्ये सडली होती. आता गेल्या सात वर्षांपासून तुम्ही युती तोडली. एकदा महाराष्ट्राला जाऊन सांगा. भाजपासोबत असताना तुम्हाला सन्मान मिळायचा, स्वाभिमानाने जगता यायचे. आज काँग्रेसबरोबर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था काय झाली आहे? उबाठा गट आता सात वर्षांमध्ये काँग्रेसबरोबर जाऊन सडलाही आहे आणि किडलाही आहे. उबाठा गटाला कीड लागली आहे आणि उबाठा गटाला पोखरून काँग्रेस वाढत आहे. जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, विधानसभा निवडणुकीमध्ये उबाठा गटाला पार पोखरून टाकण्याचे काम आणि गलीतगात्र करण्याचे काम काँग्रेसने केलं आहे. उद्धव ठाकरे यांची किती अजून वाईट अवस्था तुम्ही करणार आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा, असे बन यांनी सुनावले.