– पर्यावरण रक्षणासाठी ‘क्लायमेट ॲक्शन’ श्रेणीत पटकावला मान; साकोली तालुक्यासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
हंसराज,भंडारा साकोली (भंडारा):- भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२६’ अंतर्गत साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत खैरीवालमाझरी हिने देशातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. “क्लायमेट ॲक्शन स्पेशल पंचायत अवॉर्ड” या श्रेणीमध्ये खैरीवालमाझरीने हे घवघवीत यश मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक देशभर पोहोचवला आहे.
सांघिक प्रयत्नांचे फळ सदर मानाचा पुरस्कार मिळण्यामागे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सक्षम मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी राबविलेल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे हे यश शक्य झाले आहे. गावातील कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, सौर ऊर्जेचा वापर आणि जलसंधारणाची कामे या निकषांवर ग्रामपंचायतीने देशात आपली मोहोर उमटवली आहे.
जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा भंडारा जिल्हा हा निसर्गसंपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातोच, पण आता पर्यावरण रक्षणाच्या बाबतीत (Climate Action) येथील ग्रामपंचायतीने देशात दुसरा क्रमांक मिळवल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. खैरीवालमाझरी ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे की, जर इच्छाशक्ती आणि योग्य मार्गदर्शन असेल, तर ग्रामीण भागातही जागतिक दर्जाचे काम होऊ शकते.
सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव या ऐतिहासिक यशाबद्दल खैरीवालमाझरी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी आणि संपूर्ण ग्रामस्थांचे जिल्हास्तरावरून तसेच राज्यस्तरावरून कौतुक होत आहे. या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधितांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या पुरस्कारामुळे जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा मिळणार असून, भंडारा जिल्हा पर्यावरण संवर्धनाच्या कामात राज्याचे नेतृत्व करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.