– भंडारा जिल्हा परिषदेच्या उपकार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा; १ ते ३ जूनच्या मुंबईतील ‘आक्रोश आंदोलना’त सहभागी होण्याचे आवाहन
हंसराज,भंडारा :- जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी त्यांना तातडीने ‘भविष्य निर्वाह निधी’ (PF) लागू करावा, या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (CITU) भंडारा जिल्ह्याच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी उमेश नंदन यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की, आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांना पीएफ लागू करून जिल्हा परिषदेने त्यांच्या मानधनातून हिस्सा कपात करावा आणि त्यासोबत शासकीय रकमेचा भरणा करून ही रक्कम जमा करावी. यावेळी शिष्टमंडळाने सिटूशी संलग्न असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी, त्यांचे आधार कार्ड क्रमांक आणि नेमणूक दिनांकाची अधिकृत प्रत प्रशासनाकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे, पुणे आयुक्तांच्या आदेशाची प्रतही या निवेदनासोबत जोडण्यात आली असून, त्या धर्तीवर भंडारा जिल्ह्यातही ही प्रक्रिया राबविण्याची विनंती करण्यात आली.
या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी कॉ. राजेंद्र साठे व जिल्हा उपाध्यक्ष कॉ. प्रमोद कावळे यांनी भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पीएफची तांत्रिक प्रक्रिया कशी राबविली जाते आणि यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांना कसा फायदा होईल, याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. तसेच आशा व गटप्रवर्तकांच्या विविध स्थानिक समस्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ ते ३ जून २०२६ या कालावधीत मुंबई येथील आझाद मैदानावर ‘कामगारांचे आक्रोश आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युनियनच्या वतीने करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी कॉ. राजेंद्र साठे, कॉ. प्रमोद कावळे, उषा मेश्राम, सुनंदा बसेशंकर, सुजाता साखरे, वैशाली तांडेकर, कुमुद लिमजे, मंगला गौरी, कविता कुपाले आणि अर्धवेळ स्त्री परिचर संघटनेच्या राज्य कोषाध्यक्ष सविता हटवार उपस्थित होत्या.