◼️तरी ते योग्य नियोजनाअभावी धोकादायक
◼️रात्रीच्या वेळी या भेगा स्पष्ट दिसत नसल्याने होतात अपघात
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- लाखो रुपये खर्च करून शहरांसह गावागावांमध्ये सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. परंतु, रस्ते दिसण्यास जरी सुंदर असले तरी ते योग्य नियोजनाअभावी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे हे रस्ते लोकांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग २४७ रामटेक-भंडारा मार्गावरील घोटीटोक ते मसला या दरम्यानचा रस्ता सध्या अत्यंत जीवघेणा व धोकादायक बनला असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या भेगांमुळे वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तर काही ठिकाणी रस्त्याचा एका बाजुला खोल भेगा निर्माण झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र रस्त्याची बिकट अवस्था लक्षात घेता प्रत्येक प्रवास धोकादायक ठरत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना भेगांमुळे तोल जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी या भेगा स्पष्ट दिसत नसल्याने अपघातांची शक्यता अधिकच वाढली आहे. स्थानिकांनी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचा मधोमध मोठ्या भेगा पडल्याने वाहनांना विशेषतः दुचाकीस्वरांना मार्ग काढणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत आहे. दरम्यान, नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील भेगा भरून दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी करत आहे.
अन्यथा उग्र आंदोलन
प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास संभाव्य अपघातांची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहील. सिमेंट रस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याच्या इशाराही देण्यात आला आहे.